उपसरपंच आणि ग्रामसेवकाने फसवले; माजी सैनिकाचे संपूर्ण कुटुंब उपोषणाला बसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 07:18 PM2021-01-19T19:18:27+5:302021-01-19T19:20:41+5:30
तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून एका माजी सैनिकास फसवले
माजलगाव : तालुक्यातील दिंद्रुड येथिल तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून एका माजी सैनिकास शासकीय जमिनीवरील प्लॉट विकला. दरम्यान, ही बाब उघड झाल्याने माजी सैनिकाने जागा नावे करण्याच्या मागणीसाठी अपंग मुलांनासह पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारपासून (दि.१७) उपोषणास सुरुवात केली आहे. दरम्यान उपोषणकर्त्या माजी सैनिकाची तब्येत ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १५ ऑक्टोंबर २०१८ रोजी दिंद्रुड येथील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेले ग्रामसेवक राजकुमार झगडे व उपसरपंच युवराज ठोंबरे व गणपत ठोंबरे यांनी येथील गटनंबर ७१४ मध्ये कुठलाही वारस नसणारा शासकीय प्लॉटचे बनावट दस्तावेज तयार करून जागेचा बांधकाम परवाना गणपत ठोंबरे यांच्या नावे असल्याचा देखावा केला. दरम्यान, माजी सैनिक असणाऱ्या सुरेश मुंडे यांच्या पत्नी सुमन मुंडेला त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत हा प्लॉट ग्रामसेवक झगडे व उपसरपंच ठोंबरे यांनी विक्री केला. कालांतराने शासकीय कामासाठी प्लॉटची मूळ कागदपत्रे लागत असल्याने सुरेश मुंडे यांनी पीटीआर काढण्यासाठी ग्रामपंचायत येथे गेले. यावेळी हा प्लॉट शासकीय असल्याची बाब उघड झाली.
यावेळी त्यांनी संबंधित उपसरपंच युवराज ठोंबरे ग्रामसेवक झगडे यांना याचा जाब विचारला असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर जीव मारण्याचे धमक्या दिल्या. माजी सैनिक मुंडे यांनी बीडपासून अनेक कार्यालयात झालेल्या अन्यायाची दाद मागितली. कुठेच न्याय मिळत नसल्याने शेवटी माजी त्यांनी अपंग मुलांसह परिवारासोबत येथील पंचायती कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडाली. दरम्यान, मुंडे हे आपल्या मागणीवर ठाम असून माझा प्लॉट माझ्या नावे करा. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोरच जीव देणार असल्याच्या पवित्रा मुंडे परिवाराने घेतला आहे आहे.
मोजणीसाठी भूमिअभिलेखला कळवले
सदरील उपोषण प्रकरणात संबंधित ग्रामसेवक यांना खुलासा मागवला आहे. मोजणीसाठी भूमिअभिलेखला कळवण्यात आले असून एक महिन्यात प्रकरण निकाली काढण्यात येईल.
- प्रज्ञा माने भोसले, गटविकास अधिकारी, माजलगाव