बोगस कांदा बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक; व्यापारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 01:02 PM2021-02-15T13:02:19+5:302021-02-15T13:06:46+5:30
Cheating farmers by giving bogus onion seeds औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील दोन व्यापाऱ्यांनी केली शेतकऱ्यांची फसवणूक
कडा ( बीड ) : आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी येथील शेतकऱ्यांची बोगस कांदा बियाणे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील एका व्यापाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अन्य एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कुंभारवाडी येथील शेतकरी महेश सुनिल होळकर आणि अन्य शेतकऱ्यांनी कांदा लागवड करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील व्यापारी भगवान घनसिंग सिंघरे आणि संदीप कपूरचंद राजपूत यांच्याकडून बियाणे घेतले. मात्र हे बियाणे बोगस निघून कांद्याचे पिक उगवले नाही. एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचे बियाणे बोगस निघाले. यामुळे शेतकरी महेश होळकर आणि अन्य ८ शेतकऱ्यांनी भगवान घनसिंग सिंघरे आणि संदीप कपूरचंद राजपूत यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला.
यावरून पोलिसांनी १३ फेब्रुवारीस गंगापूर येथून आरोपी व्यापारी भगवान घनसिंग सिंघरे यास अटक केली. तर संदीप कपूरचंद राजपूत हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे. ताब्यातील आरोपीस आष्टी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल लोंखडे करीत आहेत.