वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना राज्यशासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 05:34 PM2022-11-18T17:34:22+5:302022-11-18T17:35:04+5:30
अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर (पाटोदा) येथील रहिवासी असलेल्या सुधाकर देशमुख यांनी शालेय जिवनापासूनच वृक्ष लागवड आणि संवर्धनाची आवड जोपासली आहे.
अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई येथील वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना महाराष्ट्र शासनाच्या वन व महसुल विभागाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय व्दितीय व विभागीय स्तरावरील पहिला "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार" नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील पुरस्कार प्राप्त व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था व ग्राम विभाग जिल्हा स्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सुधाकर देशमुख यांना व्यक्ती पातळीवरील राज्यस्तरीय द्वितीय व विभागीय पातळीवरील पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर (पाटोदा) येथील रहिवासी असलेल्या सुधाकर देशमुख यांनी शालेय जिवनापासूनच वृक्ष लागवड आणि संवर्धनाची आवड जोपासली आहे. पुढे १९८५ पासून या आवडीला त्यांनी सार्वजनिक स्वरुप देवून ही चळवळ अधिक व्यापक केली. सलग २० वर्षे वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम करणाऱ्या सुधाकर देशमुख यांनी सर्वप्रथम राज्यातील वृक्षांची गणना करण्यात यावी ही मागणी राज्य शासनाकडे केली होती. या मागणीचा प्रस्ताव अद्यापही शासनाच्या विचाराधीन आहे. दरम्यान, सुधाकर देशमुख यांनी वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनासाठी केलेल्या कामाची दखल घेवून राज्यशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार" जाहीर केला आहे.
सदरील पुरस्कार निवडीसाठी राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करुन योग्य व्यक्ती व संस्थांची निवड करण्यात येवून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र आणि १ लाख २५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विभागीय स्तरावरील पुरस्काराचे वितरण १० डिसेंबर २०२२ पर्यंत पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात यावे असे या शासन निर्णयात म्हटले आहे. सदरील निर्णयावर महसूल व वन विभागाचे मुख्य वन संरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांची स्वाक्षरी आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचे अनेकांनी स्वागत केले आहे.