घरी बसलेल्या गुरुजींना कामावर जाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 06:33 PM2020-10-30T18:33:35+5:302020-10-30T18:36:18+5:30
५० टक्के उपस्थितीत शैक्षणिक कामांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना
बीड : कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद असल्याचा फायदा घेत शैक्षणिक कामे टाळून घरी बसणाऱ्या गुरुजींना कामाला लागण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून तसेच पुढील काळात हंगामी ऊसतोड कामगार पाल्यांचे स्थलांतर रोखणे, भोंगा शाळा, ऑनलाईन शिक्षण व तत्सम इतर शालेय कामकाजासाठी शिक्षकांच्या उपस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत. त्यानुसार अपंग, दुर्धर आजारग्रस्त आणि ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे वगळून शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के प्रमाणात राहील याबाबतची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड-१९ बाबत ज्या शिक्षकांना तालुका अथवा जिल्हास्तरावरून जबाबदारी देण्यात आली असेल, अशा शिक्षकांची स्वतंत्र यादी तयार करून जि. प. शिक्षण विभागात सादर करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांकडून ५० टक्के उपस्थितीत १५ शैक्षणिक कामे करून घेण्याबाबत शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे.शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती व इतर पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत या कामांचा आढावा घेऊन अहवाल पाठविण्याबाबत शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी सूचित केले आहे.
शिक्षकांना करावी लागणार ही कामे
हंगामी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणे, ऊस तोडणी कामगारांसोबत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांचे स्थलांतर रोखणे, भोंगा शाळेचे नियोजन करणे, आधार कार्ड अपडेट करणे, अभ्यासक्रमाबाबत कृती आराखडा तयार करणे, अध्ययन, अध्यापन निष्पत्तीवर प्रश्नपेढी निर्माण करणे, जिओग्राफिकल गट तयार करून स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणे, शालेय ग्रंथालय तसेच विद्यार्थी संचिका अद्ययावत करणे, शैक्षणिक साहित्य तयार करणे, शाळेत परसबाग निर्माण करणे, आरटीई २५ टक्के प्रवेश पूर्ण करणे, शालेय पोषण आहार अभिलेखे अद्ययावत करणे, आहार पुरवठा, सरल प्रणालीवर प्रलंबित ऑनलाईन कामे तसेच प्रिमॅट्रिक शिष्यवृत्तीची ऑनलाईन कामे पूर्ण करणे, ऊसतोड कामगारांसोबत जाणाऱ्या पाल्यांना हमीकार्ड वितरित करणे आदी कामे शिक्षकांकडून करून घेण्याबाबत सूचना आहेत.
तर नियंत्रण यंत्रणा जबाबदार
दिलेल्या सूचनांची १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी करावी. नियंत्रण यंत्रणेमार्फत शिक्षक उपस्थितीबाबत वेळोवेळी भेट देऊन खात्री करावी, कार्यवाही होत नसल्यास संबंधित मुख्याध्यापक व नजीकच्या नियंत्रण यंत्रणेला जबाबदार धरणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सूचित केले आहे.