मुख्यमंत्री आज बीडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:42 AM2018-11-12T00:42:43+5:302018-11-12T00:43:22+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी जिल्ह्यात येत असून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ स्थिती व इतर योजनांच्या संदर्भात ते आढावा बैठक घेणार आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी जिल्ह्यात येत असून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ स्थिती व इतर योजनांच्या संदर्भात ते आढावा बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पोलीस विभागाने सुरक्षा आणि बंदाबस्ताच्या दृष्टीने नियोजन करुन रंगीत तालीम घेतली. तर दुपारी विविध विभागाच्या प्रमुखांची बैठक झाली. दुष्काळी सावटात दिवाळी साजरी केलेल्या जिल्ह्यातील जनतेला मुख्यमंत्री कोणत्या प्रकारे दिलासा देतात, याकडे लक्ष लागले आहे.
बीड जिल्ह्यात यावर्षी वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत केवळ ५० टक्के व तोही अनियमित स्वरुपात झाला. परिणामी खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. केवळ २० ते ३० टक्के उत्पादन हाती लागले, मात्र त्याचा दर्जाही सुमार आहे. पाऊसच नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांचा रबी हंगामही धोक्यात आला. यंदा मात्र नोव्हेंबरपर्यंत केवळ २ टक्के पेरा झाला.
जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये पाणी साठा उपलब्ध नाही. मोठ्या प्रकल्पांच्या मृतसाठ्यावरच मदार आहे. लघु तलाव कोरडेठाक आहेत. मध्यम प्रकल्पांचीही अशीच स्थिती आहे. सर्व धरणातील उपलब्ध पाणी साठा पिण्यासाठी आरक्षित करुन उपसा करण्यावर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपांमुळे पाणी उपसा नियंत्रणात आलेला नाही. आष्टी तालुक्यात आॅक्टोबरपासून पाणी टंचाईच्या झळा सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात टॅँकरने पाणी पुरवठा करावा या मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. मात्र अद्याप टॅँकर उपलब्ध झालेले नाही.
दुसरीकडे मागील वर्षी हमीदराने विकलेल्या सोयाबीन, उडीद, तुरीचे पेमेंट बहुतांश शेतकºयांना मिळालेले नाहीत. त्याचबरोबर पीक विम्याची रक्कमही मिळाली नसल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत. विमा कंपनी व बॅँकाकंकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांसाठी मिशन दिलासासारख्या योजना चांगल्या असल्यातरी अनेक इच्छुक लाभार्थ्यांना लाभ देताना तांत्रिक अडचणी येत आहेत. सरकारने घोषणा करुनही दुष्काळी स्थितीत अद्याप आवश्यक उपाययोजना कार्यान्वित करण्यात आलेल्या नाहीत.
ऊस संपादीत करुन दावणीला द्या
सध्या जो ऊस उभा आहे, तो पाण्याअभावी जळून जात आहे. तो ऊस तत्काळ शासनाने संपादीत करुन शेतक-यांना त्याच ठिकाणी दावणीला देण्यात यावा, रोहयोतून शेत विहीर, चर, पांदण, रस्त्याची कामे सुरु करावीत,रेशन दुकानांतून अन्नधान्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, पाण्याचा प्रश्न टॅँकर माफियांच्या विळख्यातून सुटावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.
आयजी बीडमध्ये तळ ठोकून
मुख्यमंत्र्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग सतर्क झाला आहे. उपद्रवींवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच शिवाजी पुतळा ते नगर रोड भागात पुरेसे पोलीस नियुक्त केले असून त्यांची ािहर्सल घेण्यात आली. तर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुथ्याळ हे रविवारपासून बीड शहरात तळ ठोकून बंदोबस्ताचा आढावा अधिकाºयांकडून घेत होते.
सचिवांशी थेट संवाद
आढावा बैठकीदरम्यान काही विषयांवर संबंधित विभागाच्या सचिवांशी थेट मुख्यमंत्री संपर्क करुन चर्चा करतील. यातून प्रश्नांची उकल, उपायांतील अडथळे, तांत्रिक मुद्दे या बाबींवर मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाकांक्षी योजनांचा घेणार आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
शासनाच्या विविध विभागांच्या १५ महत्वाकांक्षी योजनांची काय स्थिती आहे. नेमक्या उपाययोजना झाल्या की नाही, कुठे अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभाग प्रमुख अधिकाºयांशी चर्चा केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह हे परदेश दौºयावर असल्याने अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे जिल्ह्यातील कामकाजाची माहिती देणार आहेत. यावेळी विभागीय आयुक्त उपस्थित राहतील असे सांगण्यात आले.