मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गोपीनाथ गडावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:12 AM2019-06-03T00:12:29+5:302019-06-03T00:13:42+5:30
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त ३ जून रोजी होणाऱ्या कार्यक्र माची जय्यत तयारी गोपीनाथ गडावर झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार लोकनेत्याच्या अभिवादनासाठी येत आहेत.
परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त ३ जून रोजी होणाऱ्या कार्यक्र माची जय्यत तयारी गोपीनाथ गडावर झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार लोकनेत्याच्या अभिवादनासाठी येत आहेत. ग्रामीण भागातील तरूणांसाठी रोजगार मेळावा व भाजपा शिवसेना महायुतीच्या मराठवाड्यातील सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने होणार आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता रामायणाचार्य ह.भ.प. ढोक महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, दुपारी १ वाजता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर तसेच अन्य मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. मराठवाड्यातील भाजपा शिवसेना महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा यावेळी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
रोजगार मेळावा
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने यंदा ग्रामीण भागातील तरूणांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या बीड जिल्हयातील ५ हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. व्यावसायिक शिक्षणाबरोबरच त्यांच्या आवडीचा कोर्स एखाद्या नामांकित कंपनीत मानधन तत्वावर जॉब देऊन पूर्णकेला जाणार आहे. पुण्याची यशस्वी ही संस्था सहकार्य करणार आहे.
कोर्स पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याला चांगला रोजगार मिळू शकेल अशी व्यवस्था पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे.