विविध योजनांच्या शुभारंभ, लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री आज बीडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:56 PM2019-02-05T23:56:56+5:302019-02-05T23:58:51+5:30
शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात महिला व शिशू विभागासाठी १०० खाटांची नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. संगीता ठोंबरे, सुरेश धस, सतीश चव्हाण, विक्रम काळे, आर.टी.देशमुख,भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, माजी.आ.बदामराव पंडीत, नंदकिशोर मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी शहरात १६८ कोटी रुपयांची अटल भूयारी गटार योजना, ८८ कोटी रुपयांचे नवीन १६ डीपी रोडचे बांधकाम, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ४४८ घरांची निर्मिती, न.प.च्या सभागृहाला स्व.गोपीनाथराव मुंडे नामकरण यासह जिल्हा रुग्णालायत महिला व शिशुंसाठी १०० खाटांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व मराठवाड्यातील पहिल्या निवारा केंद्राचे लोकर्पण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी सकाळी १० वाजता मल्टीपर्पज ग्राऊंडवर शहरातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, न.प. सभापती व नगरसेवकांनी केले आहे.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त व खेळाडूंचा होणार सन्मान
नुकताच बीड जिल्ह्याच्या दोन सुपुत्रांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये डॉ.वामन केंद्रे व शब्बीर शेख यांच्यासह कुस्तीपटू राहुल आवारे, क्रिकटपटू सचिन धस यांचा देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात येणार आहे.
शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड शहरात येणार आहेत, त्यामुळे शहरातील रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात आले आहेत. तसेच रस्त्यालगतचे अतिक्रमण देखील हाटवण्यात आले असून, गटारी, रस्त्यावरील कचरा व माती झाडून स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वातावरण प्रसन्न झाल्याचे दिसून आले, अशाच प्रकारे रोज स्वच्छता करण्यात यावी असे मत शहरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.