कोकणचा ‘सरदार’ बीडच्या मंडईत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:32 AM2019-07-28T00:32:24+5:302019-07-28T00:33:25+5:30
गावकुसापासून रानावनात आणि देश- विदेशात पिकणारी विविध फळे मिळणाऱ्या बीडच्या मंडईत कोकणचा सरदार दाखल झाला आहे.
बीड : गावकुसापासून रानावनात आणि देश- विदेशात पिकणारी विविध फळे मिळणाऱ्या बीडच्या मंडईत कोकणचा सरदार दाखल झाला आहे. डेरेदार आणि विविध जीवनसत्व असणारे फणस पाहून येणारा जाणारा आणि बाराखडीत ‘फ’ फणसाचा शिकलेल्या विद्यार्थ्यांनीही उत्सुकतेने फणस पहायाला गर्दी केली होती.
बीडच्या हौशी, चोखंदळ ग्राहकांना विविध दर्जेदार फळे उपलब्ध करुन देण्यासाठी येथील फळ विक्रेत्यांत चढाओढ असते. आंब्याचा हंगाम संपत आला आहे, तरीही उत्त रप्रदेशातील लंगडा, दशेरी, चौसा आंब्यांची आवक काही प्रमाणात होत आहे. यातच शनिवारी मंडईत फणसांचा ढीगारा असलेला गाडा आकर्षण होता. एवढे मोठे फळ, जाड साल, कापण्यासाठी कसरत, रसदार चिकटपणामुळे विक्रेत्याने जागीच फणस कापून गर खरेदीची सोय केली. हवे तेवढे फळ घेता येत असल्याने ग्राहकही मिळाले. १५० ते २०० रुपये किलो दराने फणस विकले जात होते. खात्री नसताना विक्रीचे धाडस केल्याचे शहाबाज बागवान म्हणाले.