बीडमधील बाळ अदलाबदलप्रकरणी जिल्हा, खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:46 AM2018-05-23T00:46:56+5:302018-05-23T00:46:56+5:30
मूल अदलाबदल प्रकरणात जिल्हा व श्री बाल रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी संशयाच्या भोव-यात अडकले आहेत. त्यांची आरोग्य व पोलीस विभागाकडून चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी दिवसभर या प्रकरणाच्या चौकशीत प्रशासन धावपळ करीत असल्याचे दिसले. तर संबंधित अधिकारी, कर्मचाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मूल अदलाबदल प्रकरणात जिल्हा व श्री बाल रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी संशयाच्या भोव-यात अडकले आहेत. त्यांची आरोग्य व पोलीस विभागाकडून चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी दिवसभर या प्रकरणाच्या चौकशीत प्रशासन धावपळ करीत असल्याचे दिसले. तर संबंधित अधिकारी, कर्मचाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
छाया राजू थिटे (हिंगोली, ह.मु.रा.कुप्पा ता.वडवणी) या महिलेने ११ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता मुलाला जन्म दिला. त्याची नोंद प्रसुती विभागात झाली. त्यानंतर वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु येथील डॉक्टरांनी त्याला खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यावेळी येथेही मुलाची नोंद केली. त्याप्रमाणे रात्रीच बाळाला बसस्थानकासमोरील श्री बाल रुग्णालयात दाखल केले. येथी डॉक्टरांनी मात्र मुलाऐवजी मुलगी अशी नोंद केली. त्याच्यावर दहा दिवस उपचार केल्यानंतर सुट्टी दिली.
यावेळी नातेवाईकांच्या हाती मुलगी पडल्याने ते भांबावले आणि त्यांनी संताप व्यक्त करीत बाळ स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनीही खाजगी व जिल्हा रुग्णालयातील सर्व कागदपत्रे हाती हस्तगत केली. आता दोन्ही रुग्णालयातील बाळाच्या पायांचे ठसे हस्तगत केले असून ते औरंगाबादला पाठविले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडूनही मंगळवारी दिवसभर चौकशी केली जात होती.
त्या दिवशी १८ बालकांवर उपचार
११ मे रोजी दिवसभरात १८ मुले जन्मली होती. पैकी १२ मुले व ६ मुली आहेत. तर अतिदक्षता विभागात त्या दिवशी १८ मुलांनी उपचार घेतले होते. पैकी ९ मुले व ९ मुली होत्या. तसेच ५ बाळांना डिस्चार्ज दिला होता. यामध्ये एक मुलगा तर ४ मुलींचा समावेश आहे. या सर्व बाळांची चौकशी केली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
बाळाची ‘डीएनए’ चाचणी
बाळाच्या पायाचे ठसे हस्तगत केले असून ते औरंगाबादला तपासणीसाठी पाठविले आहेत. यामध्ये काही आढळले नाही तर डीएनए तपासणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून नियोजन सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.