बालविवाह; मुलांना बोहल्यावर चढविण्यात बीड राज्यात द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:27 AM2021-01-14T04:27:56+5:302021-01-14T04:27:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळीच दखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळीच दखल घेतल्याने तब्बल ६८ बालविवाह रोखण्यात प्रशासन आणि संस्थांना यश आले आहे. असे असले तरी आरोग्य मंत्रालयाने केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात बीड जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे. परभणीत सर्वाधिक ४८ टक्के बालविवाहाचे प्रमाण असून, त्यापाठोपाठ बीडचे ४३.७ टक्के आहे. हे बालविवाह थांबवण्यासाठी प्रशासन, संस्थांनी आणखी जनजागृती करण्याची गरज आहे.
मुलीचे वय १८, तर मुलाचे २१ पूर्ण झाल्यावर त्यांचा विवाह लावावा, असा नियम आहे. परंतु ग्रामीण भागात आजही लोक अल्पवयीन मुलांनाच बोहल्यावर चढवत असल्याचे दिसते. शासन, संस्थांकडून जनजागृती होत असल्याने लोक तक्रारी देण्यासाठी पुढे येत आहेत. असे असले तरी आजही लोकांची मानसिकता बदललेली नसून, बालविवाहाचे प्रमाण वाढतच चालल्याचे दिसते. आतापर्यंत रोखलेले हे बालविवाह पोलीस, बालकल्याण समिती, चाईल्ड लाईन आणि छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानने रोखले आहेत.
कोरोनाच्या आठ महिन्यांत जिल्ह्यात बालविवाह वाढले
कोरोनाकाळात अनेकांनी चोरून विवाह लावले. त्याची शासन दप्तरी नोंदही झाली नाही. ज्यांनी तक्रारी केल्या असे ६८ बालविवाह रोखण्यात आले. परिस्थिती, मुलींची असुरक्षितता, रोजगार, आदी कारणे याला होती. त्यामुळेच बालविवाह वाढत असल्याचे मत बालकल्याण समितीचे तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले.
१३ सदस्यांची बालसंरक्षक समित्या पाहतात काम
बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात ९५० बालसंरक्षक समित्या आहेत. यात मुख्याध्यापक, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी, १२ ते १८ वर्षांमधील मुलगा व मुलगी, शालेय समितीचा अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, शिक्षणप्रेमी, स्वयंसेवक असे विविध पदाधिकारी या समितीत असतात.
बालविवाह कायदा काय आहे?
मुलीचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर विवाह करणे बंधनकारक आहे. त्या आगोदर विवाह लावल्यास तो गुन्हा ठरतो. यात शिक्षेसह एक लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे. याबाबत शासनस्तरावरून वारंवार जनजागृती केली जात आहे.
आमच्याकडे तक्रार आली की प्रशासन व पोलिसांना माहिती देऊन तत्काळ गावात जातो. वयाचा दाखला तपासून खात्री केली जाते. वधू व वराच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून नोटीस बजावली जाते. तरीही एखाद्याने विवाह लावल्यास कारवाई केली जाते. याबाबत जनजागृतीही केली जात आहे.
- तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समिती सदस्य बीड