१४ वर्षीय मुलीचा लावला बालविवाह! आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 02:12 PM2023-12-27T14:12:31+5:302023-12-27T14:12:49+5:30

अंमळनेर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून सदरील ग्रामसेवकाला याची माहीती दिली आहे. 

Child marriage of 14-year-old girl! incident from Ashti taluk | १४ वर्षीय मुलीचा लावला बालविवाह! आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

१४ वर्षीय मुलीचा लावला बालविवाह! आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

- नितीन कांबळे

कडा- अवघ्या १४ वर्ष वय असलेल्या एका मुलीचा बालविवाह गावातीलच एका ड्रायव्हर तरूणासोबत मंगळवारी लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ती अल्पवयीन मुलगी कोण?तिचा विवाह कोणी लावला,कुटुंबातील लोकाना काय आमिष दाखवले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंमळनेर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून सदरील ग्रामसेवकाला याची माहीती दिली आहे. 

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याच्या घटना घडत असताना याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे.लग्न सराईत होणारे विवाह यात नवरीचे वय किती काय याची कोणीच विचारणा करत नसल्याने राजरोस पणे बालविवाह लावले जात आहेत. तालुक्यातील हातोला येथे मंगळवारी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विवाह गावातीलच एका ड्रायव्हर तरुणा सोबत सकाळी अकराच्या सुमारास पार पडला. अंमळनेर पोलीसांना ही गोपनीय माहिती मिळताच त्यानी  घटनास्थळी धाव घेऊन चौकशी अंती बालविवाह झाल्याची त्याना माहिती मिळाली. त्यानी या प्रकरणी गावच्या ग्रामसेवकाला माहीती देऊन पोलीस ठाण्यात बोलवले आहे.पण अद्याप ग्रामसेवक पोलीस आले नाहीत.मग बालविवाहाला पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवकावर देखील आता गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

महिन्यांत पाचवा बालविवाह झाल्याची चर्चा 
हातोला व परिसरात डिसेंबर महिन्यांत हा पाचवा बालविवाह झाल्याची चर्चा असून याकडे अद्याप कोणीच लक्ष दिले नाही.गावासह परिसरात याची चौकशी केल्यास धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते असे येथील एका ग्रामस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत येथील ग्रामसेवक पठाण यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मी माहिती घ्यायलाच चाललो आहे.सध्या गाडी चालवतोय थोड्या वेळात फोन करतो असे सांगून फोन ठेवला.

गुन्हा दाखल करण्यात येईल 
याबाबत अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना विचारणा केली असता ते म्हणाले की,बालविवाह झालाय अशी गोपनीय माहिती मिळाली असून घटनास्थळावरून आम्ही जाऊन आलो आहोत. सदरील गावचे ग्रामसेवक यांना माहिती दिली असून ते काय अद्याप फिर्याद देण्यासाठी आले नसून ते येताच गुन्हा दाखल करण्यात येईल असे  यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Child marriage of 14-year-old girl! incident from Ashti taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.