अंबाजोगाई तालुक्यात बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:35 AM2021-05-27T04:35:40+5:302021-05-27T04:35:40+5:30
अंबाजोगाई : तालुक्यातील साळुंकवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह २६ मे रोजी होणार असल्याची गुप्त माहिती महिला व बाल विकास ...
अंबाजोगाई : तालुक्यातील साळुंकवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह २६ मे रोजी होणार असल्याची गुप्त माहिती महिला व बाल विकास विभागाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. एम. हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बर्दापूर पोलिसांच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात येऊन बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे.
मंगळवारी या नियोजित बालविवाहाबाबत माहिती महिला व बालविकास विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधवारी बर्दापूर पोलिसांना सोबत घेत साळुंकवाडीत भेट दिली. यावेळी सदर बालिका अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले, परंतु, त्या ठिकाणी विवाह होत असल्याबाबत काहीच खाणाखुणा नव्हत्या. तरीदेखील मुलीच्या आईवडिलांकडून बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार जबाब नोंदवून घेण्यात आले. तसेच बर्दापूर पोलीस ठाण्याचे प्रमुख एपीआय आर. एल. शिंदे यांनी पालकांकडून जबाबनामा लिहून घेऊन पालकांना समज दिली. मुलीला १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच तिचा विवाह केल्यास केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, अल्पवयीन बालिकेला बालकल्याण समितीसमोर उपस्थित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. एम. हुंडेकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका ए. डी. क्षीरसागर, साळुंकवाडीच्या सरपंच तथा ग्राम बालसंरक्षण समिती अध्यक्ष विद्या माले, उपसरपंच संजीवनी बेलदार, एपीआय आर. एल. शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल पी. आर. जाधव, एस. डी. चेवले, पोलीस पाटील इंद्रशेखर कर्वे, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बी. एच. मेंगले, बाल संरक्षण समितीचे पदाधिकारी बाळासाहेब जगदाळे, जालिंदर कसाब, सुनंदा यादव- आशा स्वयंसेविका, महानंदा लिंगा- अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाजीराव ढाकणे, अंबाजोगाईचे तालुका संरक्षण अधिकारी संतोष वैष्णव तसेच इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर बालविवाह प्रकरणात अंगणवाडी पर्यवेक्षिका ए. डी. क्षीरसागर यांनी आईवडील यांना मार्गदर्शन केले व समज दिली.