बालकांची जन्मत:च आधार नोंदणीला आठवड्यात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:12 AM2020-02-04T00:12:06+5:302020-02-04T00:13:07+5:30
बीड : जन्मल्यानंतर अवघ्या काही तासांत बाळाची आधार नोंदणी होणार होती. परंतु महिना उलटूनही ही प्रक्रिया रखडल्याचे ‘लोकमत’ने रविवारी ...
बीड : जन्मल्यानंतर अवघ्या काही तासांत बाळाची आधार नोंदणी होणार होती. परंतु महिना उलटूनही ही प्रक्रिया रखडल्याचे ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणले. यावर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि ५ फेब्रुवारीपर्यंत राज्यात सर्वच जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे बीडमध्ये मंगळवारी प्रशिक्षण दिले जाणार आहे. आठवडाभरात प्रत्यक्षात आधार कार्ड देण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
१ जानेवारी २०२० पासून राज्यातील सर्वच जिल्हा, उपजिल्हा, स्त्री व ग्रामीण अशा ४९० आरोग्य संस्थांमध्ये आधार नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार होती. बाळाचे फोटोद्वारे आधार संलग्न करून रुग्णालयातून सुटी होण्यापूर्वीच पालकांच्या हाती हे कार्ड देण्याचे नियोजन होते. यासाठी आरोग्य विभाग व भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागाच्यावतीने ३४ जिल्ह्यातील एका निवासी अधिकाऱ्यांसह दोन कर्मचाºयांना पुण्यात चार दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. परंतु जिल्हास्तरावर लिपीकवर्गीय कर्मचारी आणि परिचारीका अशा दोघांना प्रशिक्षण देणे आवश्यक होते. परंतु काही तांत्रीक अडचणींना पुढे करीत आरोग्य विभागाकडून १ जानेवारीला ही प्रक्रिया राबविण्यात आली नाही. जानेवारी महिना उलटल्यानंतरही काहीच कारवाई झाली नव्हती. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने ‘बालकांच्या आधार नोंदणीची प्रक्रिया बारगळली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. यावर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हास्तरावर सर्व प्रशिक्षण देऊन तात्काळ आधार नोंदणी करण्याचे आदेश संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे बीडमध्ये मंगळवारी कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.