संकटकाळात धावणाऱ्या बाबांसारखेच पोलीस, डॉक्टर होण्याची मुलांची स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:34 AM2021-05-19T04:34:21+5:302021-05-19T04:34:21+5:30
कोरोनामुळे पोलीस, डॉक्टरांवर ताण वाढला, मुलांना वेळ दिला जात नसल्याने मानसिकतेवर होतोय परिणाम बीड : गेल्या वर्षभरापासून देशात आणि ...
कोरोनामुळे पोलीस, डॉक्टरांवर ताण वाढला, मुलांना वेळ दिला जात नसल्याने मानसिकतेवर होतोय परिणाम
बीड : गेल्या वर्षभरापासून देशात आणि राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या काळात पोलीस व डॉक्टरांच्या कामाचे तास वाढले आहेत. त्यामुळे त्यांना मुलाबाळांना वेळ देता येत नाही. याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर देखील होत असल्याचे चित्र आहे. तरी देखील संकट काळात धावणाऱ्या बाबांप्रमाणेच आम्हाला देखील जनसेवा करायची आहे, असे ठामपणे सांगत आहेत.
कोरोनाच्या काळात पोलीस व डॉक्टर थेट रुग्णाच्या संपर्कात येतात. त्यांना अहोरात्र काम करावे लागत आहे. या काळात संख्याबळ कमी असल्यामुळे कामाचे तास देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुटुंबाला वेळ कमी प्रमाणात देता येत आहे. त्यामुळे मुलांना समजून सांगावे लागत आहे. त्यामुळे अनेकांची मुले ही भविष्यात डॉक्टर किंवा पोलीस होण्यास नकार देत वेगळा मार्ग अवलंबणार आहेत. तर, काही जण संकटाच्या काळात जनसेवेसाठी धाऊन जाणाऱ्या बाबांप्रमाणेच पोलीस ऑफिसर व डॉक्टर होण्याचा निर्धार करीत आहेत.
कोरोना योद्धे डॉक्टर २५०
आरोग्य कर्मचारी ३,०००
पोलीस अधिकारी १८०
पोलीस कर्मचारी १,६३०
डॉक्टर तसेच पोलीस व्हायला आवडेल पण...
माझे वडील नेहमीच कामात व्यक्त असतात. ते लोकांची सेवा करतात. त्यामुळे घरी वेळ देता येत नाही. मात्र, लोकांच्या सुरक्षेसाठी ते कायम रस्त्यावर उभे असतात. मलाही पोलीस प्रशासनात अधिकारी व्हायचे आहे.
-अदित्य अशोक दराडे.
........................
मला पण माझ्या आई -वडिलांप्रमाणेच डॉक्टर व्हायचे आहे. पण आजच्या काळात डॉक्टरांना जेवढा मिळायला हवा तेवढा मान मिळत नाही. डॉक्टरांवर होणारे हल्ले, दवाखान्याची तोडफोड, डाॅक्टरांची बाजू न समजून घेता त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. दुसऱ्या देशात डाॅक्टरांना जी सुविधा मिळते तेवढी आपल्या देशात मिळत नाही. यामुळे मी ठरवले होते की मला डॉक्टर व्हायचे नाही. पण सर्वांंनी असा विचार करून चालणार नाही म्हणून मी ठरवलं की, मी पण माझ्या आई-वडिलांप्रमाणेच डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करणार.
-आदिती सतीश वांगीकर
...................
माझे वडील पोलीस अधिकारी आहेत. ते नेहमी कामांमध्ये व्यस्त असतात. घरी वेळ देत नसले तरी ते लोकांच्या सुरक्षिततेसाठी तैनात आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. मला देखील त्यांच्यापेक्षा मोठा पोलीस अधिकारी व्हायचे आहे.
-आदित्य रवी सानप
................
मला माझ्या वडिलांसारखे डाॅक्टर व्हायचे आहे. कोरोना येण्यापूर्वी पासूनच माझे ते स्वप्न आहे. माझे वडील माझे आदर्श असून, त्यांना पाहूनच मी डाॅक्टर व्हायचे ठरविले आहे. त्यांच्याप्रमाणेच रुग्णांची सेवा देखील करायची आहे.
-इभानन संजय जानवळे
...................
कोरोना काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी माझे वडील कर्तव्यावर असतात. त्यामुळे मागील वर्षापासून त्यांना आम्हाला देण्यासाठी कमी वेळ मिळतो. मी पण चांगला अभ्यास करून मोठा अधिकारी होणार आहे.
-अंकित महेश जोगदंड
.................
माझे वडील पोलीस आहेत, त्यांची ड्युटी बराच वेळ असल्यामुळे पहिल्यासारखा वेळ देत नाहीत. परंतु, ते करीत असलेल्या कामाचा आम्हाला अभिमान आहे. पण मला शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ व्हायचे आहे.
-राशी राहुल गुरखुदे