सततच्या लॉकडाऊनने वाढविले मुलांचे वजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:55+5:302021-03-25T04:31:55+5:30
बीड : कोरोनामुळे शाळा बंद, मैदाने बंद, अंगणात, परिसरात खेळायला पालकांचा मज्जाव, यामुळे वर्षभरापासून मुले घरातच आहेत. ...
बीड : कोरोनामुळे शाळा बंद, मैदाने बंद, अंगणात, परिसरात खेळायला पालकांचा मज्जाव, यामुळे वर्षभरापासून मुले घरातच आहेत. त्यामुळे एकाच जागी बसून दिवसभर टीव्हीसमोर बसणे आणि मोबाइल खेळण्यात मुले दंग आहेत. यातच हट्टापाेटी पालकांकडून पुरविलेले जंक फूड, तेलकट आणि गोड पदार्थ वेळीअवेळी खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मुलांचे वजन वाढत आहे. बाल आणि किशोर वयात येणारा हा लठ्ठपणा भविष्यातील आजारांना लवकर निमंत्रण देणारा ठरू शकतो, अशी धक्कादायक माहिती शहरातील बालरोग तज्ज्ञांनी दिली. घराबाहेर जाता येत नसल्याने मुलांच्या साधारण शारीरिक हालचाली मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. दिवस-रात्र टीव्ही आणि मोबाइलचा सतत वापर मुले एकाच जागी बसून करीत असल्याने व संतुलित आहाराऐवजी फास्ट व जंक फूड खाण्याकडे कल वाढल्याने मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे. शाळा सुरू असताना मुलांच्या शारीरिक हालचाली व्हायच्या. मात्र, वर्षभरात शाळेचे आणि आरोग्याचे वेळापत्रकच बिघडले आहे. खेळ, हालचाली बंद झाल्याने व आहारावर नियंत्रण राहिले नसल्याने लठ्ठपणाबरोबरच इतर आजार बळावण्याचा धोका वाढला आहे.
हा आहे निष्कर्ष आणि हे आहेत धोके
जाडी वाढल्याचा परिणाम शरीरावर होतो. रक्तदाब वाढणे, हृदयाशी निगडित आजार बळावणे, मधुमेह आदी आजार इतर सामान्यांच्या तुलनेने लवकर बळावू शकतात. मुलांमधील लठ्ठपणा मोठ्यांपेक्षा अधिक अपायकारक ठरू शकतो. बालवयातील लठ्ठपणामुळे सांध्याचे विकार कमी वयातच जडू शकतात.
----------
एकाच जागी बसून टीव्ही, मोबाइल बघणे मुलांच्या नॉर्मल, तसेच घरातल्या हालचाली बंद झाल्या आहेत. सुरुवातीला वेगवेगळ्या डिशेसचा अमर्यादित आनंद घेतला. दोन वेळच्या जेवणातील मधल्या वेळेत खाणे वाढले. साधारण १० ते १२ वयोगटातील मुलांमध्ये ४ ते ५ किलो वजन वाढल्याचे दिसून आले आहे. - डॉ.अनुराग पांगरीकर, बालरोगतज्ज्ञ तथा अध्यक्ष आयएमए, बीड.
-------------
मुलांच्या ॲक्टिव्हिटी कमी झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण व मनोरंजनामुळे स्क्रीनटाइम वाढला आहे. बसणे, झोपणे आणि खाणे वाढले आहे. त्यामुळे मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण १० ते २० टक्क्यांपर्यंत दिसून येते. यामुळे मधुमेह, ताणतणाव, चिडचिडेपणा वाढतो. भविष्यातील त्रास टाळण्यासाठी वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. - डॉ. सचिन जेथलिया, बालरोग तज्ज्ञ, बीड.
-----------
मुलांनी हे टाळावे
बेकरीचे पदार्थ, जंक फूड, गोड, अतिगोड खाणे टाळावे. वेळी-अवेळी खाणे हे टाळावे.
मोबाइल, टीव्हीसमोर डोळे आणि डोक्यावर ताण पडेपर्यंत बसू नये. तासन्तास एकाच ठिकाणी बसू नये. आहारात अनियमितपणा नसावा.
मुलांनी, पालकांनी हे करावे
टीव्ही, मोबाइल पाहण्याच्या वेळा निश्चित करून स्क्रीन टाइम कमी करावा. मुलांनी नियमित सकाळी लवकर उठावे. व्यायाम करीत नसल्यास घरातल्या घरात हालचाली वाढवाव्यात. जेवणाच्या वेळा ठरवून त्याचवेळी संतुलित आहार घ्यावा. घरासमोरील मैदान, मोकळ्या जागेत खेळावे. मुलांचे वजन, उंची दर सहा महिन्याला मोजून त्यांचा ग्रोथ चार्टनुसार वजन कमी किंवा जास्त हे योग्य आहे की नाही याची पालकांनी खात्री करावी.