लसिकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू प्रकरण; डॉक्टर म्हणतात, घटना लसीमुळे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:25 AM2018-01-30T11:25:29+5:302018-01-30T11:28:07+5:30
शहरातील नऊ महिन्याच्या चिमुकलीचा गोवर - पेन्टा लस दिल्यानंतर दुसर्या दिवशी मृत्यू झाला. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असला तरी मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, चौकशीसाठी समिती नियुक्ती केली असून, व्हिसेरा राखून ठेवलेला आहे.
परळी (बीड ) : शहरातील नऊ महिन्याच्या चिमुकलीचा गोवर - पेन्टा लस दिल्यानंतर दुसर्या दिवशी मृत्यू झाला. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असला तरी मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, चौकशीसाठी समिती नियुक्ती केली असून, व्हिसेरा राखून ठेवलेला आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी पल्स पोलिओ मोहिमेवर कमालीचा परिणाम झाला असला तरी या घटनेचा पल्स पोलिओ मोहिमेशी काहीही संबंध नाही असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
परळी शहरातील वडसावित्री नगरातील निकिता नंदू जाधव या नऊ महिन्याच्या चिमुकलीस गोवर पेन्टा लस शनिवारी देण्यात आली होती. रविवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी उप जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी निकिताचा मृतदेह पाठविण्यात आला होता. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी सुरु असलेल्या विशेष पल्स पोलिओ मोहिमेवर परिणाम झाला.
या घटनेनंतर आरोग्य विभाग जागा झाला. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा होती. अहवाल आला मात्र या अहवालातून निकिताच्या मृत्यूच्या कारणाचा नेमका निष्कर्ष काढता आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. निकिताला इंजेक्शन दिलेल्या भागाची त्वचा आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. तसेच व्हिसेरा राखीव ठेवलेला आहे. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) हे नमुने पाठविले जाणार आहेत.
लसीची होणार तपासणी
परळीतील या घटनेची माहिती आरोग्य विभागाच्या वरिष्ठांना दिली आहे. तसेच शनिवारी दिलेल्या गोवर - पेन्टा लस वापरु नये अशा सूचना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ही लस औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी दिली आहे.
पल्स पोलिओला शहरात फटका
निकिता जाधव हिला शनिवारी गोवर - पेन्टा लस दिली होती. रविवारी तिचा मृत्यू झाला. योगायोगाने रविवारी पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा जिल्हाभरात राबविण्यात आला. परंतु निकिताचा मृत्यू लसीमुळे झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने अनेक पालकांनी दक्षता घेत त्यांच्या पाल्यांना पोलिओ डोस पाजण्याचे टाळले. ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय असल्याने पल्स पोलिओ मोहीम चांगल्या प्रमाणात यशस्वी झाली आहे. शहरी भागात मात्र या मोहिमेला चांगला फटका बसला.
४१ हजार बालके अद्यापही पोलिओ डोसपासून वंचित
जिल्ह्यात एकूण २ लाख ८९ हजार ५३४ बालकांना पोलीओ डोस देणे अपेक्षीत होते. पैकी २ लाख ४८ हाजर २९० बालकांना डोस दिले असून अद्यापही ४१ हजार २४४ बालके डोस पासून वंचित आहेत. याची टक्केवारी ८५.७६ एवढी आहे. सर्व बालकांना गृहभेटीच्या वेळी पोलीओ डोस देण्यात यावा व बालकांचे आरोग्य अबाधित राखावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
काही प्रमाणात परिणाम झाला
मुलीचा झालेला मृत्यू आणि पल्स पोलिओ मोहिमेतील लसीचा काहीही संबंध नसताना संभ्रम निर्माण झाल्याने पल्स पोलिओ मोहिमेवर काही प्रमाणात परिणाम झाला. पालकांनी त्यांच्या ० ते ५ वयोगटातील वंचित बालकांना पोलिओ लस पाजण्यासाठी सहकार्य करावे यासाठी शहरी भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन पोलिओ लस देणार आहेत. तसेच अहवाल आल्यानंतर परळीतील मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड