‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:07+5:302021-07-29T04:33:07+5:30
कोरोनाकाळात विविध प्रकारचे निर्बंध असल्याने नियोजित विवाह सोहळे कसेतरी आटोपले; मात्र रजिस्टर मॅरेजच्या संख्येत बीड जिल्ह्यात काही प्रमाणात घट ...
कोरोनाकाळात विविध प्रकारचे निर्बंध असल्याने नियोजित विवाह सोहळे कसेतरी आटोपले; मात्र रजिस्टर मॅरेजच्या संख्येत बीड जिल्ह्यात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. यातच नोकरीची गॅरंटी नसल्याने भावी वरांनी ‘छोकरी’ ची निवड लांबणीवर टाकली आहे.
१) कधी किती झाले नोंदणी विवाह?
२०१८ - ८१
२०१९ - १२१
२०२० - ७४
२०२१ जानेवारी ते जुलै - ६७
२) लग्नाचे बार हजार, नाेंदणी मात्र शंभराच्या आत
कोरोनाचा काळ तसेच लॉकडाऊन, निर्बंध असल्याने अनेकांनी नियोजित विवाह उरकले तर अनेकांनी ‘चट मंगनी, पट ब्याह’ चा फंडा वापरला. त्यामुळे हजारावर लग्नाचे बार उडाले असलेतरी विवाह नोंदणीकडे बहुतांश जणांनी पाठ फिरविल्याचे दिसते. येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात विवाहासाठी नोंदणी करणाऱ्यांचे प्रमाण मागील तीन वर्षांत २०१९ वगळता शंभरच्या पुढे सरकले नाही. तुलनेत हे प्रमाण निम्म्याने कमी राहिले आहे.
३) कठीण काळात दोनाचे चार हात कसे करणार?
कोरोना महामारी पसरल्याने त्याचा परिणाम उद्योग व्यवसायांवर झाला. मी कॉर्पोरेट कंपनीत काम करत होतो; मात्र कॉस्ट कटिंगच्या धोरणाचा फटका बसला. नोकरी सोडण्याची वेळ आली. त्यामुळे नोकरीच्या आधारावर ठरवलेले स्वप्न कोसळले आहे. त्यामुळे चांगली नोकरी आणि शाश्वती मिळेपर्यंत लग्न करायचे थांबविले आहे. -- विवाहेच्छुक तरुण, बीड.
------------
खासगी उद्योगाच्या ठिकाणी काम करत होतो. पगारही व्यवस्थित होता; मात्र कोरोनामुळे उद्योजक अडचणीत आले. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कमी पगारात काम करणे शक्य नव्हते. दुसरीकडे काम शोधतोय पण कामाच्या तुलनेत पगार कमी आहे. घरखर्च वाढले आहेत. लोकांची देणी, कर्जफेड करायची कशी? यातच सध्या दोनचे चार हात कसे करायचे, असा प्रश्न आहे. -- विवाहेच्छुक तरूण, बीड.
------------
विवाह नोंदणी अधिकारी कोट
विशेष विवाह नोंदणी कायदा १९५४ अंतर्गत विवाह नोंदणी केली जाते. वधू किंवा वर यांच्यापैकी एक हा स्थानिक रहिवासी असावा. वधूचे वय १८ वर्षे पूर्ण तर वराचे वय २१ वर्षे असले पाहिजे. दोघांचे आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा दाखला आवश्यक आहे. विवाह नोंदणीमुळे कायदेशीर संरक्षण मिळते. कोणत्याही अडचणी येत नाहीत. - एम. पी. कुलकर्णी, सह दुय्यम निबंधक, वर्ग- २ बीड- १.
-----------------