पाण्यासाठी प्रशासनाला चोळी-बांगडीचा आहेर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:38 AM2021-09-23T04:38:33+5:302021-09-23T04:38:33+5:30
शिरूर कासार : शहराच्या चोहोबाजूने पाणीच पाणी असले तरी शहरातील नळयोजनेला मात्र कोरड पडली. एक महिन्यापासून पाणी पुरवठा बंद ...
शिरूर कासार : शहराच्या चोहोबाजूने पाणीच पाणी असले तरी शहरातील नळयोजनेला मात्र कोरड पडली. एक महिन्यापासून पाणी पुरवठा बंद असल्याने शहरातील नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. नगर पंचायतकडून हा प्रश्न सुटला नसल्याने आता उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी परवानगी देण्याची मागणी करीत तत्काळ पाणीपुरवठा सुरू न केल्यास चोळी-बांगडीचा आहेर देण्याचा इशारा दिला आहे. उपलब्ध असो वा नसो, शहराचा पाणीप्रश्न कायम राहतो. टंचाई काळात टँकरने पाणी मिळाले. मात्र, भर पावसाळ्यात आणि तेही नळयोजनेचा उथळा प्रकल्प तुडुंब भरला असताना एक महिन्यापासून शहर पाण्यावाचून राहिले आहे. आता मात्र संयमाचा बांध ओलांडला असून, थेट उघड्यावर नैसर्गिक विधीची रीतसर परवानगी मागत प्रशासनाची चांगलीच खिल्ली उडविली आहे. पाईप फुटला, वीज नाही, मोटार जळाली अशी वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. झालेला अडथळा दूर करण्यासाठी मोठा वेळ जात असल्याने शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक पदाधिकारी मुदत संपल्याने लक्ष देण्याची गरज मानत नसल्याचे दिसून येते. पाणीप्रश्नावर कुणीच बोलत नसल्याने अखेर त्रासलेल्या नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ॲड. नितीन देशमुख, शरद पवार, सुनील गाडेकर, शिवनाथ कातखडे, नीलेश ललवाणी, राजेश काटे, अभिलाश गाडेकर, महेश कातखडे, अशोक भांडेकर, मनोज परदेशी, आदींनी हे निवेदन दिले.
220921\1745-img-20210922-wa0031.jpg
फोटो