पीक विम्यासाठी गावात चूल बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:32+5:302021-06-30T04:21:32+5:30
बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आंदोलने करून पाठपुरावा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून माजलगाव ...
बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आंदोलने करून पाठपुरावा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण येथे १ जुलै रोजी चूलबंद, अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून शासनाने ॲग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या विमा कंपनीची नियुक्ती केली. मात्र, दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही. पीक विमा मिळावा म्हणून मुंबई येथील विमा कंपनीच्या महाप्रबंधक कार्यालयात निवेदन देण्यात आले. यानंतर जिल्ह्यात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासनाने जीआर काढून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून दिली. शासन नुकसानभरपाई देत आहे. मात्र, पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देत नाही. यासाठी १ जून रोजी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर महिला शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून एक जुलै रोजी माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण येथे संपूर्ण गावात चूल बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात प्रत्येक घरासमोर चूल बंद, अन्नत्याग असा बोर्डही लावून देणार असल्याचे थावरे यांनी खतगव्हाण येथील बैठकीत सांगितले.
===Photopath===
280621\575728_2_bed_19_28062021_14.jpeg
===Caption===
खतगव्हाण