मास्क नसल्याची बतावणी करुन लूट, तोतया सीआयडी अधिकारी अटेकत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:07 PM2022-04-12T16:07:04+5:302022-04-12T16:11:05+5:30
नामदेव महादेव नागरे (वय ७३. रा. संगमजळगाव) यांना गेवराईतील नवीन बसस्थानकाजवळ शनिवारी त्याने अडवून मास्क का लावला नाही?
गेवराई : कधी तोंडाला मास्क नाही म्हणून तर कधी तपासणीच्या नावाखाली सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करुन नागरिकांना लुटणा-या भामट्याला ९ एप्रिल रोजी गेवराई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. आजमखान अफजलखान पठाण (वय ५६, रा. मलकापूर, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे.
नामदेव महादेव नागरे (वय ७३. रा. संगमजळगाव) यांना गेवराईतील नवीन बसस्थानकाजवळ शनिवारी त्याने अडवून मास्क का लावला नाही? दंड म्हणून ३७०० रुपये द्यावे लागतील, असे म्हणत लुटले होते. त्यानंतर त्यास गेवराई ठाण्याच्या पथकाने अटक केली. चौकशीत त्याने निवृत्त पोस्ट कर्मचारी विष्णू रंगराव पंडित (७०, रा. दैठण, ता. गेवराई) यांना ४ मार्च रोजी लुटल्याचे समोर आले. पंडित हे न्यायालयासमोरून बसस्थानकाकडे पायी जात हाते. यावेळी एका बिर्याणी हाऊससमोर अनोळखी व्यक्तीने डावा हात पकडून मी सीआयडी अधिकारी आहे, तुमच्या खिशामध्ये गांजा आहे का मला दाखवा असे म्हणाला. लगेचच त्याने खिशांची झडती घेतली. यावेळी विष्णू पंडित यांनी गांजा नाही, असे सांगून पँटच्या खिशातील ९ हजार १५० रुपये त्याने काढून दाखवले. त्याने पंडित यांच्याकडून पैसे हिसकावले व दुसऱ्या खिशात हात घालून पाकीट काढले. त्यात पैसे ठेवल्याचा बहाणा करून त्याने पाकीट पुन्हा पँटमध्ये टाकून मोठ्या रस्त्याने बसस्थानकाकडे जा, असे सांगून तो निघून गेला. दरम्यान, काही वेळाने त्यांनी पाकीट उघडून पाहिले असता त्यात पैसे नव्हते. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत भामटा नजरेआड झाला होता.
....
दोन दिवसांची कोठडी
गुन्हे अन्वेषण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, सुरेश पारधी, कृष्णा जायभाय, विठ्ठल देशमुख, दिलीप सरोदे यांनी तपासचक्रे िफरवून त्यास अटक केली. आरोपी आझमखान पठाण यास रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली