नागरिकांची सतर्कता; दरोड्याच्या तयारीतील तिघे जेरबंद; दोघे फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:50 PM2019-12-13T23:50:07+5:302019-12-13T23:51:10+5:30
शहरातील कळंब रस्त्यावरील विठाई पूरम जवळील पापालाल लोहीया यांच्या लोखंडी दुकानाच्या पाठभिंतीला दडून बसलेले दरोडेखोर नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी जेरबंद केले.
केज : शहरातील कळंब रस्त्यावरील विठाई पूरम जवळील पापालाल लोहीया यांच्या लोखंडी दुकानाच्या पाठभिंतीला दडून बसलेले दरोडेखोर नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी जेरबंद केले. यातील दोन आरोपी मात्र, फरार होण्यात यशस्वी झाले. ही घटना १३ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. पोलीस फारार आरोपींचा शोध घेत आहेत.
केज शहरातील कळंब रस्त्यावरील पूर्व बाजूस असलेल्या विठाई पूरम कॉलनीजवळ पापालाल लोहीया यांनी नव्याने लोखंडी साहित्य मिळण्याचे दुकान सुरु केले आहे. या दुकानाच्या पाठीमागे १३ डिसेंबरच्या मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास पाच दरोडेखोर दडून बसले होते.
हे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती केज पोलिसांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांनी क्षणाचाही विलंब न करता रात्रीच्या गस्तीवर असलेले केज पोलीस ठाण्याचे फौजदार विलास जाधव व चालक कादरी, मंदे, दोन होमगार्ड यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सर्वजण घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलीस आपल्यावर नजर ठेऊन आहेत, हे लक्षात येताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान फौजदार विलास जाधव व त्यांच्या सरकाऱ्यांनी यांनी शिताफीने पळून जाणाºया तीन दरोडेखोरांना सिनेस्टाईल पध्दतीने पकडले, तर इतर दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणी फौजदार विलास जाधव यांच्या फिर्यादीवरून संजय राजेंद्र काळे (रा. मस्सा खंडेश्वरी, ता. कळंब), शंकर सुरेश काळे, शामसुंदर बिभीषण काळे (रा. अंधोरा, ता. कळंब), रुपेश रवींद्र काळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास एपीआय संतोष मिसळे हे करीत आहेत. केज पोलिसांनी क्षणाचा विलंब न लावता कारवाई केल्याने दरोडाच्या तयारीतील तीन दरोडेखोरांना वेळीच जेरबंद केले. या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे. तसेच गस्त वाढवण्याची मागणी देखील केली जात आहे.
चटणीची पुडी, लोखंडी रॉड जप्त
दरोडेखोरांनी दरोडा टाकताना कोणी समोर आले तर, त्याच्या डोळ््यात चटणी टाकून मारहाण करण्यासाठी लोखंडी टांबी, रॉड, काठी, कत्ती, खिळे ही हत्यारे आणली होती. ती ही पोलिसांनी जप्त केली. तसेच एक महागडा मोबाईल तीन दरोडेखोरांकडून ताब्यात घेतला आहे.
माल नेण्यासाठी ट्रक
दरोडेखोरांनी लोखंडाच्या दुकानातील सळया व इतर लोखंडी साहित्य चोरून घेऊन जाण्यासाठी ट्रक (एमएच १३ एक्स ३८९७ ) आणला होता.
सर्व दरोडेखोर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आहेत. या वस्तीमध्ये सराईत गुन्हेगार वास्तव्यास असल्याची देखील माहिती आहे.
बीड पोलिसांकडून विविध गुन्ह्यातील आरोपी या परिसरातून अनेक वेळा जेरबंद केले अहेत.