रुग्णांच्या मदतीसाठी नागरिकांचा पुढाकार ; - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:35 AM2021-04-28T04:35:43+5:302021-04-28T04:35:43+5:30
चॅरिटी अंबाजोगाई : प्रशासनाचा भार होतोय हलका, आवश्यक वस्तूंसह औषधींचा पुरवठा अंबाजोगाई : कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी शहरातील अनेक मदतीचे ...
चॅरिटी अंबाजोगाई : प्रशासनाचा भार होतोय हलका, आवश्यक वस्तूंसह औषधींचा पुरवठा
अंबाजोगाई : कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी शहरातील अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. अनेकांनी रोख स्वरूपात देणगीही दिली. लोखंडी सावरगाव कोविड केअर सेंटरला विविध नित्योपयोगी वस्तू दिल्यानंतर आता गिरवलकर तंत्रनिकेतन येथील कोविड सेंटरला काही वस्तू देण्याची तयारी सुरू झाली आहे.
येथील उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या संकल्पनेतून ‘चॅरिटी अंबाजोगाई’ या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात करण्यात आली. अनेक दानशूर व्यक्ती, संस्थांनी सढळ हस्ते मदत केली. राष्ट्र संवर्धन मंडळाच्या वतीने वॉशिंग मशीन भेट देण्यात आली. तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेने १९ हजार रुपयांची मदत केली. युवा उद्योजक प्रदीप ठोंबरे यांनी ५१ हजारांची मदत केली. तर डॉ. कल्पना गोपाळ चौसाळकर यांनी ११ हजार रुपयांची वस्तुरूपी मदत केली. खोलेश्वर शिक्षण संकुलाच्या वतीने अत्यावश्यक औषधी देण्यात आली. या उपक्रमातून चॅरिटी अंबाजोगाईच्या वतीने दोन लाख रुपयांच्या आवश्यक वस्तूंची कोविड सेंटरला मदत करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘चॅरिटी अंबाजोगाई’च्या वतीने लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला विविध वस्तूंची मदत करण्यात आली. तेथे अनेक वस्तूंचा तुटवडा आहे हे लक्षात येताच त्यांनी मदतीचे आवाहन केले. रोटरीचे संतोष मोहिते व इतर सदस्यांनी पुढाकार घेऊन आपल्या मित्रपरिवार व हितचिंतकांना आवाहन केले. त्यानंतर रोख रकमेसह वस्तुरूपी मदतीचा ओघ वाढत गेला. वॉशिंग मशीन, फरशी क्लीन, कूलर, खुर्च्या, ऑक्सिजन मास्क, दोन फवारणी यंत्रे देण्यात आली. हात धुण्याचे साबण, १०० किलो वॉशिंग पावडर, मास्क, रजिस्टर, दीडशे बकेट, ६० फडे, ऑफिस टेबलची मदत झाली. आर्थिक रक्कम रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी ट्रस्टच्या माध्यमातून जमा करून दोन्ही कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. अरुणा केंद्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी शरद झाडके, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, नायब तहसीलदार स्मिता बाहेती, तृप्ती उमरे, संतोष मोहिते, प्रवीण देशमुख, डॉ. महादेव केंद्रे, डॉ. सय्यद इम्रान, अतुल जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर, कल्याण काळे, विश्वनाथ लहाने, गणेश राऊत, प्रवीण चोकडा, राम सारडा, अजय पाठक, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे ॲड. किशोर गिरवलकर, बिपीन क्षीरसागर, डॉ. प्रवीण जोशी, डॉ. घुले इत्यादी उपस्थित होते.
नागरिकांच्या पुढाकारातून रुग्णांना केलेल्या मदतीमुळे रुग्णालयाची सोय झाली आहे.
===Photopath===
270421\27bed_2_27042021_14.jpg~270421\27bed_1_27042021_14.jpg