अनलॉक होताच नागरिक सैराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:02+5:302021-06-09T04:41:02+5:30
बीड : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर सोमवारी जिल्ह्यात अनलॉकच्या पहिल्या दिवशी बाजारात सर्वच दुकाने उघडल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. ...
बीड : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर सोमवारी जिल्ह्यात अनलॉकच्या पहिल्या दिवशी बाजारात सर्वच दुकाने उघडल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. तर किराणा आणि भाजी बाजारात वर्दळ कमी दिसून आली. शहरातील मोंढा, सुभाष रोडवर दिवसभर वाहतूक कोंडीचा अनुभव नागरिकांना आला.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यातच सुरूवातीला किराणा, भाजी, बेकरी, आदी जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेला काही तासांसाठी मुभा दिली होती. मात्र अत्यावश्यक सेवेत नसलेल्या आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश होते. त्यानंतर निर्बंध आणखी कडक करीत किराणा, भाजी, बेकरी या अत्यावश्यक सेवादेखील सलग पंधरा दिवस बंद ठेवण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने शासनाने ठरविलेल्या तिसऱ्या स्तरात बीड जिल्ह्याचा समावेश झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून शहरातील अत्यावश्यक सेवांसह अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने उघडली. कापड, मोबाईल, सराफा, भांडी आदी सर्वच दुकाने दोन महिन्यानंतर उघडली. तर दोन महिन्यांपासून तुंबलेली खरेदी करण्यासाठी लोक घराबाहेर पडले. त्यामुळे शहरातील सर्वच भागात वर्दळ दिसून आली. अनलॉकचा पहिला दिवस असल्याने ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होती.
सुभाष रोडवर आदर्श मार्केट, सिद्धी विनायक संकुल, सुभाष रोड, माळीवेस , कारंजा, बशीरगंज, मोंढा भागातील विविध दुकानांवर ग्राहक दिसून आले.
---------
कोरोनाचे भान विसरले
अनलॉकनंतर पहिल्या दिवशी बाजारात उसळलेली गर्दी पाहता लोक कोरोनाचे भान विसरल्याचे दिसून आले. दुकानांमध्ये सॅनिटायझर शोभेलाच होते. अनेक जण मास्क वापरताना दिसून आले. तर काही जण उघड्या तोंडाने फिरताना दिसून आले. भेळ, चहाच्या गाड्यांभोवती लोकांचा गराडा दिसून आल्याने कोरोनाचे भान विसरले की काय? असे वाटत होते.
------------
सोशल डिस्टन्स वाऱ्यावर
कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने साथरोग कायद्यानुसार नियम सुरुवातीपासून लागू केलेले आहेत. मात्र सोमवारी अनलॉक म्हणजे रान मोकळे अशा अविर्भावात दुकानांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा कठोर पाऊल उचलावे लागणार आहे.
---------
वाहतुकीची कोंडी
अनलॉकमुळे नागरिक खरेदीसाठी लेकराबाळांसह घराबाहेर पडले होते. तर माल वाहतुकीच्या वाहनांची ये- जा सुरू होती. दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची शहरात जागोजागी कोंडी झाली होती.