दुष्काळात रेशन मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:28 AM2019-05-01T01:28:06+5:302019-05-01T01:28:51+5:30
आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर मागणीप्रमाणे मजुरांच्या हाताला काम व स्वस्त धान्य दुकानातून पुरेसे धान्य नागरिकांना मिळावे, यासाठी शासनाने वाढीव धान्य कोटा देण्याची मागणी लोकप्रतिनीधींनी केली होती. मात्र, ती मागणी पूर्ण तर झालीच नाही. आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाख कुटुंब स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. परंतु, दुकानदारांच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रत्येक महिन्याला फक्त तीन ते साडेतीन लाख कुटुंबांनाच स्वस्त धान्याचा लाभ दिला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागिराकांना आर्थिक परिस्थिती नसताना देखील खूल्या बाजारातून महाग धान्य खरेदी करावे लागत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमिवर मागणीप्रमाणे मजुरांच्या हाताला काम व सरसकट स्वस्त धान्य देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनस्तरावर ही मागणी गांभीर्याने घेतली गेली नाही. तसेच जिल्हा पुरवठा विभागाकडून आलेले धान्य देखील लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोचवले जात नसल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्र्यांना दिली खोटी माहिती
नोहेंबर महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी अनेक कुटंबांना रेशन मिळत नसल्याचा मुद्दा आ.जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी माहिती मागवली मात्र, ई-पॉसचे कारण पुढे करत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळ मारुन नेली. वास्तविक ई-पॉज प्रणालीमुळे लाभार्थ्यांना धान्य नाकारता येत नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांना यावेळी खोटी माहिती देण्यात आली होती.