मास्क वापरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:50+5:302021-06-19T04:22:50+5:30
उघडी रोहित्रे धोकादायक वडवणी : ग्रामीण भागातील व शहरातील महावितरणच्यावतीने विद्युत पुरवठ्यासाठी शहरासह शेतशिवार व अन्य ठिकाणी रोहित्रे बसविली ...
उघडी रोहित्रे धोकादायक
वडवणी : ग्रामीण भागातील व शहरातील महावितरणच्यावतीने विद्युत पुरवठ्यासाठी शहरासह शेतशिवार व अन्य ठिकाणी रोहित्रे बसविली जातात. सुरुवातीला रोहित्राच्या पेट्या बंद असतात, मात्र या पेट्यांची दारे चोरी होत असल्याने बहुतांश रोहित्र साहित्य उघडे पडते. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे वीज वितरण विभागाने तात्काळ स्वच्छता, दुरूस्ती करून उघड्या रोहित्रांना पेट्या बसवून रोहित्र सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात मुख्य रस्ता बनला शौचालय
वडवणी : तालुक्यातील बंहुताश गावात स्वच्छता अभियानअंतर्गत यशस्वीपणे शौचालये उभारण्यात आले. वैयक्तिक शौचालय अनुदानही दिले जात आहे; मात्र आजही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुख्य रस्ता, गावाच्या सीमेवर सकाळी शौचास बसणाऱ्या नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील रस्त्याची झाली चाळण
वडवणी : तालुक्यातील कवडगाव, मोरेवाडीला जाण्यासाठी वर्दळीचा ठरत असलेला वडवणी-कवडगाव रस्ता आता त्रासदायक झाला आहे. वडवणीपासून मामला, साळीबा, पिपरखेड या १० कि.मी. अंतर व मामला तलाव वळण असलेल्या ठिकाणी रस्ता पूर्णतः उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
ताडपदरी, सिटकव्हरची विक्री जोमात
वडवणी : तालुक्यात पावसाने जोरदार सुरुवात केल्याने टूव्हिलर सीट कव्हर व प्लास्टिक खोळीची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने दमदार सुरुवात केल्याने नागरिक गाड्यांची काळजी घेत असल्याचे दिसते आहे. काही दिवसांपूर्वी गाडीच्या खोळीसाठी शहरांमध्ये खरेदी करण्यासाठी जावे लागत होते. आता मात्र प्रत्येक खेड्यापाड्यात फेरीवाले येत असल्याने सध्या तरी ग्रामीण भागातील नागरिकांची समस्या मिटली आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी आपल्या जनावरांना पावसाळ्यामध्ये त्रास होऊ नये यासाठी गोठ्यावर मेणकापड, ताडपदरी, प्लास्टिक टाकून गोठे सुरक्षित करताना दिसत आहेत.