विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:34 AM2021-04-24T04:34:32+5:302021-04-24T04:34:32+5:30
आधार लिंक बंधनकारक अंबाजोगाई : स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने सर्व नगर परिषदा तसेच नगर पंचायतींना शासनाकडून आधार फिडिंगचे उद्दिष्ट देण्यात ...
आधार लिंक बंधनकारक
अंबाजोगाई : स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने सर्व नगर परिषदा तसेच नगर पंचायतींना शासनाकडून आधार फिडिंगचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक अर्जदाराच्या अर्जासोबत आधार लिंकिंग करण्यात आले आहे. शासनाने ही अट घातल्याने आधार लिंकिंगसाठी आधार केंद्राची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
महामार्गाचे काम होईना
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूरमार्गे मांजरसुंबा ते केज या राज्य महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.
श्वानांंना आवरा
बीड : शहर व परिसरात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. या श्वानांमुळे अनेक वेळा नागरिक भयभीत होत असून, या टोळक्याने फिरणाऱ्या श्वानांचा पालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
जनावरांचा ठिय्या
माजलगाव : शहरातील रस्त्यांवर अनेक मार्गांवर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेक वेळा अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे; परंतु याकडे संबंधितांनी अद्यापही दुर्लक्ष केलेले आहे.
वृक्षतोड थांबवा
पाटोदा : येथील डोंगररांगांमधून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. याकडे वनविभाग, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, परिसरातील ग्रामस्थांमधून वृक्षतोड थांबविण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सॉ मिलची तपासणी करून कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.
स्वच्छता होईना
बीड : शहरातील अनेक ठिकाणी तसेच सहयोगनगर, स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी वाढतच चालली आहे. पालिकेतर्फे नियमित सफाई केला जात नसल्याने या कचऱ्यात आणखी भर पडत आहे.
मोबाईल रेंज मिळेना
पाटोदा : तालुक्यात दोन महिन्यांपासून ‘बीएसएनएल’च्या ग्राहकांना खंडित सेवेचा त्रास होत आहे. अनेक वेळा रेंज नसल्याने मोबाइलधारकांना त्रास होत आहे. सुरळीत सेवेची मागणी होत आहे.