नागरिक बिनधास्त; मास्क, सॅनिटायझरची विक्री घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:14+5:302021-08-20T04:38:14+5:30
अंबाजोगाई व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांमध्ये बिनधास्तपणा वाढल्याने कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसऱ्या ...
अंबाजोगाई व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांमध्ये बिनधास्तपणा वाढल्याने कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव म्हणून मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे. हे नियम सांगितले जात होते व पालनही होत असे. डबल मास्क वापरा आणि कोरोना टाळा असाही सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मार्च ते मे या तीन महिन्यात मास्कच्या विक्रीतही मोठी वाढ झाली होती. जून महिन्यापासून लाट ओसरत असल्याने नागरिक बिनधास्त झाले आहेत. आता मास्क वापरणेही अनेकांनी बंद केले आहे. सुरक्षिततेच्या त्रिसूत्रीचा विसर अनेकांना पडू लागला आहे.
त्रिसूत्रीचे पालन महत्त्वाचे
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अजूनही कोरोना संपलेला नाही. आपल्या परिसरात दररोज ४ ते ५ रुग्ण बाधित निघत आहेत. याशिवाय तिसऱ्या संभाव्य लाटेची भीती व्यक्त होत आहे. यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायझर व सतत हात धुणे ही त्रिसूत्री कायम चालू राहू द्या. सुरक्षिततेसाठी लसीकरणाचे दोन डोस घ्या.
- डॉ. अतुल शिंदे,
मधुमेह तज्ज्ञ, अंबाजोगाई.