महास्वच्छतेसाठी एकवटले बीड शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:15 PM2020-03-04T23:15:24+5:302020-03-04T23:17:21+5:30
नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग जि.रायगड ) तर्फे आणि बीड पालिकेच्या सहकार्याने संपूर्ण बीड शहरात आठ मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
बीड : नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग जि.रायगड ) तर्फे आणि बीड पालिकेच्या सहकार्याने संपूर्ण बीड शहरात आठ मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातून प्रतिष्ठानचे जवळपास २५ हजार श्री सदस्य या स्वच्छता महायज्ञात सहभागी होतील, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्रतिष्ठानचे सिद्धेश्वर आडसुळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी इंजि विष्णू देवकते, सुभाष सपकाळ उपस्थित होते.
प्रतिष्ठानने स्वच्छता अभियान हे राष्ट्रीय कार्य हाती घेतले असून अनेक वर्षांपासून त्यांचे हे काम नियमित चालू आहे. कार्याची प्रसिद्धी न करता सेवा आणि कर्तव्य म्हणून हे प्रतिष्ठान काम करीत आहे. ते म्हणाले की, स्वच्छता अभियानात बीड न.प.ने देशात झालेल्या स्वच्छता पाहणीत ५१२ वा क्रमांक मिळविला होता. धडक स्वच्छता मोहीम यासह विविध स्वच्छता उपक्र माच्या माध्यमातून न.प.ने देशात १०२ वा क्र मांक पटकावून स्वच्छता अभियानामध्ये आपली ओळख निर्माण केली.
बीड शहराचे वाढते क्षेत्र लक्षात घेता पालिकेची यंत्रणा कमी पडत आहे, तसेच स्वछतेच्या बाबतीत जनजागृतीची गरज आहे. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून बीड शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होणार आहे. जवळपास २० ते २५ हजार स्वयंसेवक सेवा भावातून संपूर्ण राज्यातून बीड शहरात येणार असून अवघ्या चार तासांमध्ये बीड शहर स्वच्छ करणार आहेत.
न.प.प्रशासन, सामाजिक संस्था, व्यापारी संस्था यांचा या अभियानात सहकार्याच्या भूमिकेत सहभाग राहणार आहे. नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानचे सर्व साधक कसल्याही लाभाची अपेक्षा ठेवून काम करीत नाहीत तर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून स्वच्छता अभियानात स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत.
या प्रतिष्ठाणने महास्वच्छता अभियानासाठी बीड शहराची निवड केली त्याबद्दल मी नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठानचे आभार मानतो, असे डॉ.क्षीरसागर यांनी सांगितले.
अभियानासाठी यंत्रणा सज्ज
या अभियानासाठी स्वंयसेवकाना मदत करण्यासाठी शहरातील व्यापारी अन नागरिक सहभागी होणार आहेत. जवळपास ४७ मार्ग, स्मशानभूमी, शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळ, शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये अभियान राबवले जाणार आहे. ७०० ट्रॅक्टर, २५ जेसीबीद्वारे एक हजार टन कचरा गोळा केला जाणार आहे.
केवळ राष्टÑासाठी कार्य - आडसूळ
राष्टÑाने आपल्यासाठी खूप काही केले आहे. आपणही राष्टÑासाठी, भारतमातेसाठी काही तरी निष्काम भावनेने केले पाहिजे, या उदात्तहेतूने नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान कार्य करीत आहे. यासारख्या स्वच्छता अभियानासह वृक्षारोपण, रक्तदान शिबीर असे उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात, असे प्रतिष्ठानचे बीड जिल्ह्याचे सिद्धेश्वर आडसूळ यांनी यावेळी सांगितले.