माजलगाव शहर ४६ सीसीटीव्हीच्या निगराणीत राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:36 AM2021-02-20T05:36:22+5:302021-02-20T05:36:22+5:30
माजलगाव शहरातील ४६ महत्त्वाच्या ठिकाणी उच्च दर्जाच्या कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. या माध्यमातून शहरातील चोऱ्या, छेडछाडीचे प्रकार,भांडण आदि ...
माजलगाव शहरातील ४६ महत्त्वाच्या ठिकाणी उच्च दर्जाच्या कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. या माध्यमातून शहरातील चोऱ्या, छेडछाडीचे प्रकार,भांडण आदि सह गुन्हेगारी घटनांसह इतर बाबींवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. शहर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांच्यासमोर मागील आठवड्यात हा प्रस्ताव मांडला होता. त्या अनुषंगाने गुरुवारी मल्टीस्टेट पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील महत्त्वाची ठिकाणे असणारी संभाजी चौक, रंगोली कॉर्नर, शिवाजी चौक, नरवडे कॉम्प्लेक्स,आंबेडकर चौक, करवा पेट्रोल पंप,आझाद चौक, हनुमान चौक, परभणी टी पॉइंट,सिद्धेश्वर शाळा - महाविद्यालय ,सोळंके महाविद्यालया समोरील परिसर, इत्यादी ४६ महत्त्वाच्या ठिकाणी उच्च दर्जाचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सदरील कॅमेरे ४ मेगापिक्सल एचडी हाय डेफिनेशन, नाईट व्हिजन आहेत.त्याबरोबर सदरील कॅमेरे कॉर्डलेस असून त्यांना डिश अँटिना आहे. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण शहर पोलिसांकडे राहणार आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसणार आहे.
चौकट,
तीन वर्षे सीसीटीव्हीची देखभाल, दुरुस्ती
शहरात मुख्य ४६ ठिकाणी सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. या सीसीटीव्हीचे तिन वर्षाचे संबंधित ठेकेदारास देखभाल दुरुस्ती साठी निधी राखुन ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले असुन यासाठी लागणारा निधी जमा झाला आहे. याशिवाय शहरातील नगरसेवकांनीही वार्डासह इतर ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी जनतेतुन पुढे आली आहे.