चोरीच्या संशयावरून दोन महिला ताब्यात शहर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:35 AM2021-08-22T04:35:42+5:302021-08-22T04:35:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबेजोगाई : चोरी करीत असल्याच्या संशयावरून दोन महिलांना बस स्थानकामधून शहर पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. ताब्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबेजोगाई : चोरी करीत असल्याच्या संशयावरून दोन महिलांना बस स्थानकामधून शहर पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या महिला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गर्दीच्या ठिकाणी चोरी करीत असल्याचा संशय शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या महिलांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शिवनंदा कसबे आणि महादेवी दीडे (रा.जयनगर, लातूर) अशी त्या महिलांची नावे आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंबेजोगाई बस स्थानकामध्ये प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्याकरिता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी शुक्रवारी बस स्थानकामध्ये सापळा लावला होता. दरम्यान, साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास संशयित दोन महिला जाणाऱ्या प्रत्येक बसकडे व गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय पोलिसांना बळावला. प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेत असतानाच, यात दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस कर्मचारी गोविंद येलमटे, महिला पोलीस नाईक स्नेहा गोरे यांच्यासह इतर कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी होते.
...
सावधानता बाळगा
प्रवाशांनी बसमध्ये चढत असताना आपल्या स्वतःच्या मौल्यवान दागिन्यांची व रोख रकमेची काळजी घेणे आवश्यक आहे. चेन स्नॅचर व खिसेकापूंपासून सावध राहून संशयित व्यक्तीची माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले आहे.
....