केज ठाण्यात दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:34 AM2021-05-10T04:34:28+5:302021-05-10T04:34:28+5:30
केज : तालुक्यातील उमरी येथे शेतीच्या वादातून नाली खोदण्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ...
केज : तालुक्यातील उमरी येथे शेतीच्या वादातून नाली खोदण्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन दोन्ही गटांस केज ठाण्यात आणले असता पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांसमक्ष दोन्ही गटांतील लोकांनी ‘फ्री स्टाईल’ हाणामारी केली. याप्रकरणी केज पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील उमरी येथे भाऊराव चाळक आणि शेख अली अकबर यांची शेजारी जमीन आहे. रविवारी दुपारी तीन वाजेदरम्यान दोघांत जुन्या भांडणाची कुरापत काढून व शेतातील नाली खोदण्याच्या कारणावरून भांडण झाले. दोन्ही शेतकऱ्यांचे गट परस्परांशी भिडले. त्यात दगड, विटा आणि लाठ्याकाठ्यांनी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. त्यात एकाच्या उजव्या हाताची करंगळी तुटली आहे, तर एकाचे दात पडले आहेत. अन्य एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच उमरी येथे पोलीस पथक पोहोचले आणि त्यांनी हस्तक्षेप करून भांडण सोडविले.
त्यानंतर दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी केज पोलीस ठाण्यात समोरासमोर येताच पुन्हा त्यांच्यात तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाली. यावेळी वाहनांवरही दगडफेक झाली.
याप्रकरणी दोन्ही गटांतील स्त्री व पुरुष मिळून सुमारे १२ ते १३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
===Photopath===
090521\deepak naikwade_img-20210509-wa0023_14.jpg