काका-पुतण्याच्या वादात स्वच्छ व सुंदर बीड झाले ‘घाण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:40 AM2021-09-04T04:40:22+5:302021-09-04T04:40:22+5:30

बीड : शहराच्या विकासावरून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व आ. संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधकही ...

Clean and beautiful bead becomes 'dirt' in uncle-nephew dispute | काका-पुतण्याच्या वादात स्वच्छ व सुंदर बीड झाले ‘घाण’

काका-पुतण्याच्या वादात स्वच्छ व सुंदर बीड झाले ‘घाण’

Next

बीड : शहराच्या विकासावरून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व आ. संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधकही केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. इकडे मूलभूत समस्या वाढत आहेत. शहर अस्वच्छ होत असताना त्याबद्दल कोणीच ब्र शब्द काढत नाही. यामुळेच स्वच्छ व सुंदर असणारे बीड शहर सध्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. राजकारण्यांच्या वादामुळे अधिकारीही बिनधास्त आहेत. शहर घाण ठेवून स्वच्छतेचे नुसते प्रमाणपत्र घेण्यात त्यांना रस असल्याचे दिसत आहे.

बीड नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून डॉ. भारतभूषण क्षीरसागर, तर उपनगराध्यक्ष पदावर त्यांचेच पुतणे व आ. संदीप क्षीरसागर यांचे लहान बंधू हेमंत क्षीरसागर आहेत. राज्यात सत्तेत एकाच बाकावर बसलेले असले तरी बीड पालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी कायम विरोधक राहिले आहेत. दोन दिवसांपूर्वीच नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन आ. संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. शहरातील विकासाला आ. क्षीरसागरच खोडा घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी नगर रोड, बार्शी रोडवरील व्हिडिओ दाखवत आमदारांनी काहीच विकास केला नसल्याचे सांगितले, तर दुसऱ्या बाजूला शहरात केवळ मुख्य रस्तेच नव्हेत, तर अंतर्गत रस्त्यांचीही वाट लागलेली आहे. हे सर्व रस्ते पालिकेच्या हद्दीत आहेत. याला पालिकाच जबाबदार असताना त्याचा एकही व्हिडिओ दाखविण्याची हिंमत नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर अथवा नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांनी दाखविली नाही, तसेच स्वच्छता व पाणीपुरवठा या प्रश्नावरही त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.

दरम्यान, शहरात स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते, सुरक्षा आदी समस्या वाढल्या आहेत. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून याची जबाबदारी आ. क्षीरसागरांवर आहे; परंतु मागील दोन वर्षांपासून रस्त्यांची केवळ डागडुजी होत आहे. पाऊस आला की, पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होते. पुन्हा दुरुस्ती असा काहीसा प्रकार करून लाखो रुपये गुत्तेदारांच्या घशात घालण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप बीडकर करत आहेत. विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्व मूलभूत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

--

स्वच्छतेसाठी एवढी यंत्रणा करतेय काय?

राजकारण्यांचे वाद होत असले तरी पालिकेकडे प्रशासन म्हणून स्वच्छतेसाठी मोठी यंत्रणा आहे. कचरा संकलनासाठी ४५ घंटागाडी, १५ ट्रॅक्टर, ३ टेम्पो, ४ जेसीबी, २०० पालिकेचे कर्मचारी, गुत्तेदाराचे १०० पेक्षा जास्त कामगार, २० कंटेनर, स्वच्छता निरीक्षक असा फौजफाटा आहे; परंतु तरीही शहर घाणच असल्याचे दिसत आहे. मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांचा फोन लागला नाही, तर कार्यालयीन अधीक्षक युवराज कदम यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे प्रशासनाची बाजू समजली नाही.

--

शहर विकासात आमदारांनीच खोडा घातला आहे. पालिकेच्या हक्काचा निधी इतरात्र वळवून घाणेरडे राजकारण केले जात आहे, तसेच शहरात वाढलेले अवैध धंदे यालाही आमदारांचेच अभय आहे.

-डॉ. भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्ष, बीड

--

नगराध्यक्षांनी काय आरोप केले हे मी पाहिलेच नाहीत. त्यामुळे मी काहीच बोलणार नाही.

-आ. संदीप क्षीरसागर, बीड

--

रोज निघणारा कचरा - ३५ टन

ओला कचरा - १६ टन

सुका कचरा - १९ टन

030921\03_2_bed_14_03092021_14.jpeg

बीड शहरातील स्टेडीयम कॉम्प्लेक्स परिसरात कुंडी भरूनही पालिकेने उचलली नाही. त्यामुळे रस्त्यावर असा कचरा पांगला आहे.

Web Title: Clean and beautiful bead becomes 'dirt' in uncle-nephew dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.