स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला प्रारंभ; ६० गटांतून ६० कुटुंबांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:45 AM2019-01-08T00:45:09+5:302019-01-08T00:46:13+5:30
जिल्ह्यात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला प्रारंभ झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत सहभाग घेऊन स्वत: रंगकाम व कायम वापर करणाऱ्या साठ जिल्हा परिषद मतदार संघ गटातील ६० कुटुंबांची निवड करून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील एक ग्रामपंचायत याप्रमाणे प्रथम येणा-या ग्रामपंचायतीस कुटुंब संख्येच्या प्रमाणात तीस हजार रुपयांपर्यंतचे परितोषिक मिळणार आहे. ६० ग्रामपंचायतींमधून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीस कुटुंब संख्येच्या प्रमाणात ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत स्वच्छतेच्या उपक्रमात सर्व शौचालय वापरात व स्वच्छ रहावी या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या वतीने दिनांक ३१ जानेवारीपर्यंत स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणारी शौचालये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र होणार आहेत.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर देखरेख समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
दवंडी, ध्वनिक्षेपकाच्या मदतीने तसेच गृहभेटीच्या माध्यमातून ग्रामस्थांना वैयक्तिक शौचालय समाज प्रबोधनपर संदेशाने रंगविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कुटुंबांनी स्वत: शौचालयाचे रंगकाम करावयाचे आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पाच हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे. किमान एकूण कुटुंब संख्येच्या ५० टक्के शौचालय रंगवलेली ग्रामपंचायत व कुटुंब या स्पर्धेसाठी पात्र राहणार आहेत.
जिल्हास्तरीय स्पर्धा
६० ग्रामपंचायती जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र होणार असून, यापैकी प्रथम येणा-या १५० कुटुंब संख्या असलेल्या ग्रामपंचायतीस २५ हजार रुपये, ३०० कुटुंबसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीस ३५ हजार रुपये, तर ३०० पेक्षा जास्त कुटुंब संख्या असलेल्या ग्रामपंचायतीस ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्वच्छ व सुंदर शौचालय असणारे कुटुंब व ग्रामपंचायतींची शिफारस तसेच आवश्यक प्रस्ताव गावातील देखरेख समितीमार्फत होणार आहे. शिफारस झालेल्या कुटुंबाची प्राथमिक पाहणी गटविकास अधिका-यांमार्फत पथक करील. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निवडलेल्या समितीमार्फत अंतीम तपासणी करण्यात येणार आहे. उत्कृष्ट, सुंदर व स्वच्छ शौचालय तसेच गटातील ग्रामपंचायतींची घोषणा ही तपासणी समिती करणार असून स्पर्धेबद्दल उत्सुकता वाढली आहे.