चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटला; कॅबीनमध्ये दबल्याने क्लीनर जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:44 PM2019-11-29T12:44:42+5:302019-11-29T12:45:00+5:30
आष्टी तालुक्यातील धामणगाव जवळील वळणावर घडली घटना
कडा : धामणगावजवळ वळण रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटून कॅबीनमधील क्लीनरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० च्या दरम्यान घडली. श्रीकांत अंकुश माने (२६ ) असे मृताचे नाव असून तो आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील रहिवासी आहे.
आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील चालक परसराम मिसाळ, व क्लिनर श्रीकांत माने हे दोघे कंटेनरमधून ( क्र. MH 46, AR. 3777 ) बीडकडे जात होते. धामणगावजवळ वळण रस्त्यावर झिंजुर्कॅ वस्ती नजीक चालक मिसाळ यांचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर उलटला. यात कॅबीनमधील क्लीनर श्रीकांत दबला गेल्याने जागीच मृत्यू झाला. श्रीकांतच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पोपट मंजुळे करीत आहेत.
वडिलांचाही झाला होता अपघाती मृत्यू
साधारण पाच वर्षांपूर्वी श्रीकांत यांच्या वडिलांचा पुण्याजवळ अपघात झाला होता. यानंतर घरची जबाबदारी श्रीकांतवर आली होती. सुरवातीला तो गावात गंवड्याच्या हाताखाली काम करायचा. मात्र दोन महिन्यांपासून तो कंटेनरवर क्लीनर म्हणून काम करत असे. घरातील कर्त्या पुरुषांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.