आम आदमी पक्षाकडून नगर परिषदेची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:14+5:302021-02-15T04:30:14+5:30
बीड : शहरात नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. नगरपरिषद स्वच्छतेचा नुसता देखावा करत असल्याचा आरोप करत आम आदमी ...
बीड : शहरात नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. नगरपरिषद स्वच्छतेचा नुसता देखावा करत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाकडून गांधीगिरी करत, मागील काही आठवड्यांपासून शहरातील विविध भागांत स्वच्छता अभियान राबविले जात आहे. रविवारी चक्क नगर परिषद कार्यालयातील घाण साफ करून आंदोलन करण्यात आले.
आम आदमी पक्षाकडून सलग ७ व्या रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रविवार, १४ फेब्रुवारी रोजी आपच्या वतीने करण्यात येणारे गांधीगिरी अभियान थेट नगरपरिषद कार्यलयाच्या उंबरठ्यावर पोहोचले. गुटखा, तंबाखू खाऊन थुंकण्याने रंगलेल्या नगरपरिषेदच्या भिंती आपच्या कार्यकर्त्यांनी साफ केल्या. तर, नगरपरिषद कार्यालय व परिसर असलेली सर्व घाण झाडून गेट परिसर स्वच्छ करून आंदोलन केले.
नगरपरिषद कार्यालयच जर अस्वच्छ असेल तर शहर कसे आहे, हे नागरिकांनी जाणून घ्यावे. नगरपरिषदेचा कारभार म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याचा आरोप करत स्वच्छतेच्या बाबतीत नुसता देखावा सुरू असल्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, संघटन मंत्री ज्ञानेश्वर राऊत, शहराध्यक्ष सय्यद सादेक, शेरकरसह आम आदमीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.