बीडमध्ये बाळाची अदलाबदल न झाल्याचे ‘डीएनए’तून स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:53 PM2018-05-30T23:53:33+5:302018-05-30T23:53:33+5:30
मूल अदलाबदल प्रकरणात केवळ डॉक्टर व परिचारिकांचा गलथान कारभारच जबाबदार असल्याचे समोर आले आहे. लिहिण्यात चूक झाल्याने हे ‘रामायण’ घडले आहे. ती मुलगी छाया राजू थिटे यांचीच असल्याचे डिएनए (डीआॅक्सीरिबोन्यूक्लिकाईक अॅसिड) अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
बीड : मूल अदलाबदल प्रकरणात केवळ डॉक्टर व परिचारिकांचा गलथान कारभारच जबाबदार असल्याचे समोर आले आहे. लिहिण्यात चूक झाल्याने हे ‘रामायण’ घडले आहे. ती मुलगी छाया राजू थिटे यांचीच असल्याचे डिएनए (डीआॅक्सीरिबोन्यूक्लिकाईक अॅसिड) अहवालावरून स्पष्ट झाले आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या तीन डॉक्टर व चार परिचारिकांमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली, शिवाय जिल्हा रूग्णालयाची बदनामीही झाली आहे. या सर्वांवर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाठविला आहे.
छाया राजू थिटे (हिंगोली, ह.मु.रा.कुप्पा ता.वडवणी) या महिलेने ११ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता बाळाला जन्म दिला. त्याची नोंद प्रसुती विभागात झाली. त्यानंतर वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु येथील डॉक्टरांनी त्याला खाजगी रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यावेळी येथेही मुलाची नोंद केली. त्याप्रमाणे रात्रीच बाळाला बसस्थानकासमोरील श्री बाल रूग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी मात्र मुलगी अशी नोंद केली. या नवजात शिशुवर दहा दिवस उपचार केल्यानंतर सुटी दिली. यावेळी नातेवाईकांच्या हाती मुलगी पडल्याने ते भांबावले आणि त्यांनी संताप व्यक्त करीत बाळ स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली होती.
बाळ अदलाबदल केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ जिल्हा व खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब नोंदविले. बाळाचे रक्त नमुने घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठविले. बुधवारी सायंकाळी त्याचा अहवाल आला. यामध्ये ही मुलगी छाया राजू थिटे यांचीच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क केला असून त्यांना बीडला बोलविल्याचे सांगण्यात आले.
नाईकवाडे, बनकरचा जबाब, तो मुलगाच..
हे प्रकरण घडल्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित सर्व डॉक्टर व परिचारीकांचे लेखी जबाब घेतले होते. यावेळी शुभांगी नाईकवाडे आणि संगीता बनकर यांनी तो मुलगाच होता, असा जबाब दिला आहे. तर डॉ.दीपाली घाडगे यांनीही तो मुलगाच होता, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. परंतु लेखी दिले नाही. डॉ.बडे व डॉ.कुत्ताबादकर यांनी आपण उपचार केल्याचे सांगितले. परंतु नाईकवाडे व बनकर यांनी मुलगा पाहिलाच कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. डॉ.मोराळे यांच्याबद्दलही संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा रूग्णालयाची बदनामी
मागील आठ दिवसांपासून मुल अदलाबदल प्रकरणामुळे जिल्हा रूग्णालय चर्चेत आले होते. त्यातच आता परिचारिका व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीची नोंद मुलगा अशी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया, प्रसुती व इतर दर्जेदार सेवांमुळे प्रतिमा उंचावलेले जिल्हा रूग्णालय या प्रकरणामुळे बदनाम झाले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पाटील, डॉ.सतिष हरीदास यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले होते.
‘कारकुनी’ चुकीमुळे सा-यांना त्रास
या सर्व प्रकरणात जिल्हा रूग्णालयातील चार परिचारिका व तीन डॉक्टर दोषी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. प्रसुती झाल्यानंतर परिचारिकेने लिहिण्यात चूक केल्यानेच हा सर्व प्रकार घडल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बाळाचे डीएनए रिपोर्ट जुळल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर जिल्हा रूग्णालय प्रशासनाला मात्र बदनामीला तोंड द्यावे लागत आहे.
लिहिण्यात चुक
या प्रकरणात सर्व दोषी असणाºयांचा प्रस्ताव तयार करून तो आरोग्य उपसंचालकांना पाठविला जाणार आहे. विभागीय चौकशी आणि प्रशासकीय कारवाई करावी, असे नमूद केले आहे. दोषींवर कारवाई केलीच जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. लिहिण्यात चुक झाल्यानेच हा प्रकार घडल्याचे सध्यातरी दिसून येते. चौकशी सुरूच आहे.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
११ ते २१ मे दरम्यान काय घडले...?
११ मे रोजी सकाळी छाया थिटे यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. दुपारी ४.४५ वाजता त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. शुभांगी नाईकवाडे या परिचारिकेने त्यांची प्रसुती केली.
त्यानंतर नाईकवाडे यांनी सपना राठोड या आपल्या सहकारी परिचारिकेला मुलगा झाल्याची नोंद करण्यास सांगितले. हा सर्व प्रकार स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.दीपाली मोरे यांच्या अधिपत्याखाली सुरू होता.
त्यानंतर बाळाचे वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. येथे संगिता बनकर यांच्याकडे बाळ सुपूर्द केले. त्यांनीही मुलगा अशी नोंद करून घेतली.
काही वेळाने डॉ. अनिल कुत्ताबादकर व डॉ.परमेश्वर बडे यांनी त्या बाळाची तपासणी केली. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी बाळाला इतरत्र हलविण्याचा सल्ला दिला.
सुनीता पवार यांनी बाळ नातेवाईकांच्या स्वाधीन केले. त्यानंतर बसस्थानकासमोरील श्री बाल रूग्णालयात या खाजगी रूग्णालयात त्याला दाखल केले. येथे १० दिवस उपचार केल्यानंतर २१ मे रोजी बाळ थिटे यांच्या स्वाधीन केले.
यावेळी त्यांना हा मुलगा नसून मुलगी असल्याचे दिसले. त्यांनी आपल्या मुलाची अदलाबदल केली असा आरोप करीत बाळ स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला.
मुलीसह थिटे दाम्पत्याचे रक्त नमुने घेऊन डीएनएसाठी पाठविले. बुधवारी त्याचा अहवाल आला आणि ती मुलगी थिटे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले.