कारकूनास लाच घेताना एसीबीने पकडले; उपविभागीय अधिकारी बाफना जेवताजेवता झाल्या फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 04:33 PM2024-01-24T16:33:00+5:302024-01-24T16:33:27+5:30
कारवाईची माहिती समजताच अर्धवट जेवण सोडून एसडीओंची धूम
बीड/माजलगाव : मुलासह पुतण्याला दिलेले आणि बहिणीचे राहिलेले जात प्रमाणपत्र देण्यासाठी माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुनाने खासगी एजंटामार्फत ३० हजार रुपयांची लाच मागितली. ती घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी साडेतीन वाजता माजलगाव उपविभागीय कार्यालयात करण्यात आली. दरम्यान, कारवाईची माहिती समजताच उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी कक्षात जेवण अर्धवट सोडून तेथून धूम ठोकली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
वैभव बाबूराव जाधव (वय ३२, रा. माजलगाव) हा लिपिक असून शेख अशपाक (वय २४, रा. माजलगाव) हा एजंट आहे. याच तालुक्यातील व्यक्तीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. यात तक्रारदाराची दोन मुले, भावाची दोन मुले आणि बहिणीच्या प्रमाणपत्राचा समावेश होता. यातील चारही मुलांचे प्रमाणपत्र दिले होते. परंतु, बहिणीचे बाकी होते. दिलेले प्रमाणपत्र आणि राहिलेल्या बहिणीच्या प्रमाणपत्राचा मोबदला म्हणून प्रत्येकी १० हजार याप्रमाणे ५० हजार रुपयांची लाच वैभव याने मागितली होती. तडजोडीअंती ३० हजार रुपये घेण्याचे ठरले होते. परंतु, संबंधिताने बुधवारी सकाळी बीडचे एसीबी कार्यालय गाठून सकाळी ११ वाजता लेखी तक्रार केली.
एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्यासह पथकाने लगेच माजलगावातील उपविभागीय कार्यालयाबाहेर सापळा लावला. दुपारी साडेतीन वाजता वैभव जाधव याच्या वतीने शेख अशपाक याने ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर लगेच दबा धरून बसलेल्या पथकाने या दोघांनाही रंगेहाथ पकडले. वैभव जाधव, शेख अशपाक यांच्याविरोधात माजलगावात गुन्हा दाखलची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई उपअधीक्षक शंकर शिंदे व त्यांच्या पथकाने केली.
अन् बाफना चालकाच्या दुचाकीवरून फरार
वैभव आणि शेख याने लाच स्वीकारण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या खोलीत तक्रारदाराला बोलावले. ही लाच घेताच त्यांना पकडले. ही बातमी बाजूच्या खोलीत असलेल्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांना समजली. त्यांनी जेवण अर्धवट सोडून तत्काळ कार्यालयाबाहेर येत आपल्या वाहन चालकाच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना देखील लाच घेताना पकडण्यात आले होते. यावरून उपविभागीय कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय सामान्यांची कामे होत नसल्याचे दिसून येत आहे.
वैभवकडून सामान्यांची अडवणूक
येथील उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून वैभव जाधव याची एक वर्षापूर्वी माजलगाव तहसील कार्यालयातच बदली झालेली आहे. परंतु, तरीही उपविभागीय अधिकारी कार्यालयातून त्यास कार्यमुक्त करण्यात आलेले नव्हते. वैभव हा सामान्यांची कामे पैसे घेतल्याशिवाय करत नव्हता, हे येथील नागरिकांनी सांगितले. जो पैसे देईल, त्याचेच काम वैभव करत हाेता, अशी चर्चाही कार्यालयात कारवाईनंतर ऐकावयास मिळाली.