बंद जि. प. शाळांत साप-विंचवाचा धोका; झाडे-झुडुपेही वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:06+5:302021-09-15T04:39:06+5:30
पुरुषोत्तम करवा/ लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद व संस्थेच्या काही शाळांमध्ये शाळा बंद असल्याने ...
पुरुषोत्तम करवा/
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद व संस्थेच्या काही शाळांमध्ये शाळा बंद असल्याने झाडे-झुडपे, गवत मोठ्या प्रमाणावर उगवल्याने या शाळांमध्ये सध्या विंचू, साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. शिक्षक शाळेत येतात व हजेरी लावून जातात. त्यांना जबाबदारीचे भान नसल्याने शाळांमध्ये साप, विंचवामुळे धोका वाढला आहे.
माजलगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २२८ शाळा आहेत तर खासगी ८२ शाळा आहेत. या शाळांमध्ये ३९ हजार ३२१ विद्यार्थ्यांची संख्या आहे तर जिल्हा परिषद व संस्थेचे मिळून १ हजार ३०० शिक्षक आहेत. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा पूर्णपणे बंद आहेत तर सुरुवातीचे एक वर्ष शिक्षक देखील शाळांपासून दुरावले होते. त्यामुळे या शाळांच्या कंपाऊंडमध्ये झाडे, झुडपे, गवत मोठ्या प्रमाणात उगविले आहे.
सध्या शिक्षकांना दररोज शाळेत येणे बंधनकारक केल्याने अनेकजण दररोज शाळेत हजेरी लावून जातात. तर अनेकजण गप्पागोष्टी करून निघून जातात. त्यामुळे त्यांचे शाळेच्या आवारात व शाळा खोल्यांच्या दुरावस्थेकडे शिक्षकांचे दुर्लक्ष दिसून आहे. मुख्याध्यापकांचे नाही. अनेक शाळांच्या आवारात लहान लहान मुले खेळताना आढळतात. यामुळे या ठिकाणी एखादेवेळी मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
------
अनेक शाळांमध्ये असलेल्या वर्ग खोल्यांमध्ये धुळीचे साम्राज्य दिसून येते. अनेक खोल्या तर कित्येक दिवस झाडल्या जात नसल्याने या ठिकाणी धुळीने वर्ग माखले आहेत.
------
ज्या शाळांमध्ये घाण साचली आहे किंवा झाडे, झुडपे, गवत आदी उगविले आहे. हे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांची आहे; परंतु अनेक शाळेत त्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष होताना दिसते.
-------
जिल्हा परिषद शाळेतील व खासगी शाळेतील शिक्षकांना दररोज शाळेत येणे बंधनकारक केले आहे. खासगी शाळेतील शिक्षकांची उपस्थिती पूर्ण असल्याचे दिसून येते तर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे आलटून पालटून येत असल्याचे अनेक गावांतील नागरिक सांगतांना दिसतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची संख्या कमी प्रमाणात दिसून येते.
...
‘माझं सुंदर कार्यालय’ या अंतर्गत सर्व शाळांमध्ये रंगरंगोटी, स्वच्छता करण्यात येत आहे. सर्व शिक्षकांना शाळा स्वच्छ ठेवण्यास सांगण्यात आले आहे. जेथे कुठे शाळा अस्वच्छ असल्यास त्या तत्काळ स्वच्छ करून आजूबाजूला असलेली झाडेझुडपे काढून घेण्यास सांगण्यात येईल.
- एल. बी. बेडसकर, गटशिक्षणाधिकारी, माजलगाव.
140921\img_20210914_164449_14.jpg
जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वाढलेली झाडे, गवत.