बंद रेल्वेचा लालपरीला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:15+5:302021-06-09T04:42:15+5:30
परळी : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने बीड जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे ७ जूनपासून राज्य ...
परळी : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने बीड जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे ७ जूनपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू झाली आहे. तर परभणी, लातूरकडे जाणारी रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवासी पर्याय म्हणून एस. टी. बसचा आधार घेत आहेत. पर्यायाने एस. टी. च्या उत्पन्नात भर पडत आहे.
बारापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी परळीत देशातून विविध ठिकाणचे भाविक येतात. मात्र, लॉकडाऊनमुळे येणाऱ्यांची संख्या रोडावली होती. आता येत्या काळात संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच्या येथील आगारातून दररोज बसच्या २२ फेऱ्या सुरू केल्या असून यातून पहिल्या दिवशी सोमवारी परळी बस आगारास ७० हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. तर मंगळवारी परळी येथून बीडकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी संख्या चांगली होती. लॉकडाऊनमुळे परभणी, लातूरकडे जाणाऱ्या रेल्वे बंद असल्याने परळीहून बसने परभणी, लातूरकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे . मंगळवारी परळी बस स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी होती. सकाळी बसमधून ४४ प्रवासी बीडकडे रवाना झाले. परळी बस स्थानकातून बीडला बसच्या पाच फेऱ्या सुरू केल्या आहेत. परभणी व लातूर येथेही प्रत्येकी पाच बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. परळी-अंबाजोगाई २, परळी- सोनपेठ २ व अन्य ठिकाणी मिळून एकूण २२ बस फेऱ्या सुरू केल्या आहेत.
परळीतून रोज एसटीच्या फेऱ्या - २२
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या - ३५०
धावणाऱ्या रेल्वेंची संख्या - ०६
प्रवासी - २५०
बसने परभणी, लातूर, बीडला गर्दी
राज्य परिवहन महामंडळाच्या परळी आगारातून सुटणाऱ्या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासभाडे कमी असलेतरी रेल्वे बंद असल्याने परभणी, लातूरकडे जाणाऱ्या बसेसमध्ये गर्दी दिसून येत आहे. तर औरंगाबाद, जालन्याकडे जाणारे प्रवासी बीडमार्गे जात असल्याने बहुतांश बसेसची प्रवासी सेवा पूर्ण क्षमतेने होत आहे.
हैदराबाद, औरंगाबाद रेल्वेला प्रतिसाद
परळी रेल्वे स्थानकातून नांदेड -बंगळुरू, बंगळुरू -नांदेड , औरंगाबाद- हैदराबाद, हैदराबाद- औरंगाबाद, काकीनाडा -शिर्डी , शिर्डी - काकीनाडा या सहा रेल्वे धावत आहेत. यापैकी औरंगाबाद- हैदराबाद, हैदराबाद -औरंगाबाद या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर पनवेल आणि पुणे या रेल्वे गाड्या बंद आहेत.
अत्यावश्यक कामासाठीच प्रवास
नोकरीच्या कामानिमित्त एस. टी. महामंडळाच्या बसने सोमवारपासून येणे-जाणे सुरू केले आहे. मंगळवारी बीडकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी संख्या जास्त होती.
-विजयकुमार खोसे, प्रवासी परळी.
परळी -आंबाजोगाई बस सुरू झाल्याने सोय झाली. लॉकडाऊनमध्ये दुचाकीवरून पॅथॉलॉजीचे नमुने घेऊन जावे लागत होते. बसचा प्रवास चांगला आहे. भीती काही नाही. -
अनिल बांगर, बसप्रवासी, परळी
परळी स्थानकातून सॅनिटाइझ केलेल्या बसेस रोज सोडण्यात येत आहेत. कोरोनाचे नियम व सोशल डिस्टन्स पाळण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी महामंडळाच्या बसने प्रवास करावा. नागपूर, भुसावळ, बोरीवली, पुणे या बससेवा दोन दिवसांत सुरु करणार आहोत.
- प्रवीण भोंडवे, आगार प्रमुख, परळी वैजनाथ.
सध्या हैदराबादकडे जाणारे प्रवासी अधिक आहेत. स्थानकात सॅनिटाइझ, मास्क बंधनकारक आहे. कन्फर्म तिकिट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जातो. वेटिंगवर असणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. कोरोनामुळे मर्यादित सामानासह लोक प्रवास करतात. तसेच खाद्यपदार्थही स्वत:च घरून आणतात.
- जितेंद्रकुमार मीणा, रेल्वे स्थानक प्रमुख, परळी.
मंगळवारी बीड- माजलगाव बसमध्ये प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला.
-