ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:19+5:302021-09-09T04:40:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात पाऊस आणि ढगाळ वातावरण राहात आहे. याचा सर्वात जास्त धोका हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात पाऊस आणि ढगाळ वातावरण राहात आहे. याचा सर्वात जास्त धोका हा अस्थमा असणाऱ्यांना आहे. थंड हवा, नवे उगवलेले गवत आदींमुळे श्वसननलिका आकुंचन पावते. त्यामुळे दमा व खोकला येतो. त्यामुळे अस्थमा असणाऱ्या लोकांनी पर्यटन दौरा तर सोडाच परंतु थंड हवेत बाहेर पडणे टाळावे. तसेच कोमॉर्बिडीटी आजार असणाऱ्यांनीही डॉक्टरांच्या उपचाराखाली राहून योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. ढगाळ वातावरणात अस्थमा रूग्णांनी स्वत:ची काळजी घ्यावी.
प्रतिकारशक्ती कमी
अस्थमा रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. या रुग्णांनी आहार चांगला ठेवावा. परंतु थंड, आंबट व तेलकट पदार्थ खाणे प्रामुख्याने टाळावेत. ताजे अन्न खाण्यावर अधिक भर द्यावा. आहार चांगला ठेवल्यास आणि योग्य काळजी घेतल्यास जास्त त्रास होत नाही.
बालकांमध्ये अस्थमा
मोठ्यांप्रमाणेच बालकांमध्ये अस्थमा असतो. याला बाल दमा म्हणतात. दोघांचीही पॅथॉलॉजी सारखीच आहे. त्यामुळे मुलांना थंडीत बाहेर काढू नये. त्यांना उबदार कपडे परिधान करून काळजी घ्यावी.
ही घ्या काळजी
थंड हवेत जाऊ नये, नवे उगवलेल्या गवताच्या ठिकाणी जाऊ नये, थंड पदार्थ खाणे टाळावे, तोंडाला मास्क, रूमाल वापरावा. आहार चांगला ठेवावा. तेलकट, थंड अन्न खाऊ नये. डॉक्टरांचा वारंवार सल्ला घ्यावा.
काळजी घ्या, पथ्य पाळा, त्रास होणार नाही...
ढगाळ वातावरणात अस्थमा रूग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु संतुलित आहार घेऊन डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाळण्यासह काळजी घेतल्यास रुग्णांना त्रास होत नाही. कोमॉर्बिडीटी रुग्णांनी डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली काळजी घ्यावी. - डॉ.अनिल बारकुल, वैद्यकीय तज्ज्ञ, बीड
080921\08_2_bed_7_08092021_14.jpg
डॉ.अनिल बारकुल