मुख्यमंत्री-क्षीरसागरांची ‘चाय पे चर्चा’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:31 AM2017-12-02T00:31:54+5:302017-12-02T00:32:12+5:30
सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिका-यांच्या निवडीत सुरेश धस आणि ...
सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिका-यांच्या निवडीत सुरेश धस आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांनी दिलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी सावरत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी क्षीरसागरांच्या बंगल्यावर जाऊन चहापान केल्यामुळे जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे.
बीड नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार यांनी आ. क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर आणि उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांना जवळ केल्यामुळे पवार आणि क्षीरसागर यांच्यामध्ये राजकीय तणावास सुरुवात झाली होती. यानंतर हा तणाव वाढतच गेला आणि संदीप क्षीरसागर आणि पवार यांची जवळीक अधिक घट्ट होऊ लागली. यामुळे नाराज झालेले आ. जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीपासून अलिप्त राहू लागले. मध्यंतरी अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या दोन कार्यक्रमांना तसेच बीडमध्ये निघालेल्या मोर्चासही आ. क्षीरसागर आणि त्यांचे बंधू बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी गैरहजेरी लावली होती. तेंव्हापासूनच क्षीरसागर बंधू हे राष्ट्रवादीतून बाहेर पडतील, अशी चर्चा जोर धरीत असतानाच आठ दिवसांपूर्वी आ. क्षीरसागर यांनी माजी मंत्री सुरेश धस यांची आष्टीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन बंद दरवाजाआड घेतलेली भेट देखील जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली होती.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. जयदत्त क्षीरसागर यांचे चहापानाचे निमंत्रण स्वीकारुन त्यांच्या बंगल्यावर भेट दिली. त्यांच्यासमवेत पालकमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री डॉ. गिरीश महाजन, आ. विनायक मेटे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी त्यांचे हेलिकॉप्टर सकाळी साडेदहाच्या सुमारास बीडमध्ये उतरले तेंव्हा त्यांच्यासमवेत असलेल्या आ. जयदत्त क्षीरसागर यांना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमवेत बंगल्यावर जाऊन चहापान घेतले. तसेच त्यांच्यासमवेतच बीड शहरातील एका कार्यक्रमास एकत्र उपस्थिती दर्शवली.
स्थानिक बीड विधानसभा निवडणुकीत काठावर का होईना राष्ट्रवादीची जागा राखण्यात जयदत्त क्षीरसागर यांना यश आले होते. बाकी पाचही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. असे असताना देखील भाऊबंदकीस राष्ट्रवादीतूनच मिळत असलेल्या फूसमुळे आ. क्षीरसागर हे अस्वस्थ्य होते. छोट्या-मोठ्या कार्यक्रमातून पुतणे संदीप क्षीरसागर यांची होत असलेली टीका चर्चेचा विषय होती. आमदारकीच्या तांत्रिक कारणामुळे जयदत्त क्षीरसागर यांनी आपले पत्ते ‘ओपन’ केले नसले तरी आपल्या हालचालीवरुन मात्र त्यांनी राष्ट्रवादीपासून दूर जाण्याचे संकेत दिले आहेत.
माजी मंत्री सुरेश धस, आ. जयदत्त क्षीरसागर, शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांचे कधीही जिल्ह्यातील राजकारणात जमत नव्हते, परंतु बदलत्या राजकारणात या मंडळींची जवळीक वाढल्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. केज विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांचे पती नंदकिशोर मुंदडा हे देखील राष्ट्रवादीपासून चार हात दूरच आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या स्रुषा नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्याही राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत जयदत्त क्षीरसागर आणि मंडळींच्या संपर्कात आहेत.
बंगल्यावरील भेटीची परंपरा
काँग्रेसमध्ये असताना जिल्ह्याच्या नेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या बंगल्यावर जाऊन शरद पवार यांनी जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेतली होती. त्यानंतर जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले होते. बंगल्यावरच्या या भेटीची परंपरा यावेळीही कायम राहील, अशी चर्चा आहे.
तुम्हीही बोलावले तर येईन
चहापानाचे निमंत्रण होते म्हणून गेलो होतो, तुम्हीही बोलावले तर जरुर येईल. माझ्या इतर कार्यक्रमांपेक्षा या चहापानाच्या कार्यक्रमाला माध्यमातून अधिक प्रसिद्धी मिळेल, हे मला माहीत आहे. या चहापानाच्या खुलासा मी करणार नाही, परंतु जयदत्त अण्णा तुम्हाला मात्र या चहापानाचे खुलासे द्यावे लागतील, ही जबाबदारी तुमची आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री