दुष्काळ, आरक्षण प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 08:09 PM2023-09-07T20:09:50+5:302023-09-07T20:09:58+5:30
आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
अंबाजोगाई -: महाराष्ट्रात सद्या दुष्काळ व आरक्षण हे प्रश्न गंभीर बनले आहेत.या मुख्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावे. या प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी अंबाजोगाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
या वेळी बोलताना खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तामिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने घटनेत दुरुस्ती करून आरक्षण दिले. त्याच धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम यांना आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपा सरकारने आपल्या जाहीरनाम्यात दिलेले आहे. ते पूर्ण करावं. आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खा. सुळे यांनी केली.
तसेच हे सरकार महागाई, बेरोजगारीकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यातील अनेक उद्योग बाहेर जात आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही. तसेच दर आठवड्याला होणाऱ्या कॅबीनेट तीन तीन आठवडे होत नाहीत. जरी झाली तरी ती एक ते दीड तास उशिराने सुरू होते, याचेही मंत्र्यांना गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.
'ते' टोळक गेवराईतून पाठविण्यात आले- आ.राजेश टोपे
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पहिली भेट देणारे नेते शरद पवार आहेत.या वेळी आंदोलनस्थळी ज्या लोकांनी शरद पवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या ते टोळक गेवराई येथून पाठविण्यात आले होते, असा घणाघाती आरोप आ.राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र याचा सुत्रधार कोण? हे सांगणे मात्र त्यांनी टाळले.