माजलगावच्या कृषी केंद्र चालकास बियाणे देणारा परभणीचा विक्रेता सहआरोपी

By शिरीष शिंदे | Published: June 27, 2024 08:10 PM2024-06-27T20:10:30+5:302024-06-27T20:10:38+5:30

जिल्हा गुण नियंत्रकांनी माजलगाव शहर पोलिसांना दिला जबाब

Co-accused Parbhani seller who gave seeds to agricultural center operator of Majalgaon | माजलगावच्या कृषी केंद्र चालकास बियाणे देणारा परभणीचा विक्रेता सहआरोपी

माजलगावच्या कृषी केंद्र चालकास बियाणे देणारा परभणीचा विक्रेता सहआरोपी

बीड : शेतकऱ्यांना अधिक दराने कापूस बियाणे विकल्याप्रकरणी माजलगाव येथील महावीर ॲग्रो एजन्सी ३१ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदरील एजन्सी चालकाकडे आढळलेल्या पावत्यानुसार चौकशी केली असता परभणी जिल्ह्यातील एका दुकानदाराकडून बियाणे आणल्याचे समोर आले. दोन्ही कृषी केंद्र चालकांनी बियाण्याची स्मगलिंग केल्याचे दिसून आले. या प्रकरणी जिल्हा गुण नियंत्रकांनी माजलगाव शहर पोलिसांना पुरवणी जबाब देत परभणी येथील कृषी केंद्र चालकास सहआरोपी करण्याचे पत्र दिले आहे.

माजलगाव येथील महावीर ॲग्रो एजन्सीच्या मालकाकडे चौकशी केली असता त्यांना परभणी जिल्ह्यातील ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्राचे प्रो. विठ्ठल वामन आवचार यांनी कापूस बियाणे विक्री केल्याचे आढळून आले. विठ्ठल आवचार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे कापूस बियाणे विक्री परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच महावीर ॲग्रो एजन्सीला विक्री बंदचा आदेश दिलेले बियाणे कंपनीला परत करण्याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालकांनी दिले होते. परंतु महावीर एजन्सीने तसे न करता ८६ कापसाच्या बियाण्याची पाकिटे हे ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्रास परत दिले.

विशेष म्हणजे, ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्राकडे कोणताही कापूस बियाणे खरेदी-विक्रीचा परवाना नसताना ८६ कापूस बियाण्यांची पाकिटे महावीर एजन्सीकडून परस्पर परत घेतले. ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्राचे विठ्ठल आवचार यांच्याकडे कोणताही कापूस बियाणे विक्रीचा परवाना नसताना बेकायदेशीररीत्या खरेदी करून तसेच स्टॉप सिल लावलेले कापूस बियाणे परत घेतले. या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण अंबुरे यांनी माजलगाव पोलिसांना पुरवणी जबाब दिला आहे. तसेच ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्राचे विठ्ठल आवचार यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार माजलगाव येथील महावीर ॲग्रो एजन्सी विरुद्ध झालेल्या गुन्ह्यात आता आवचारसुद्धा सहआरोपी असणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी संगेकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी, विक्रेत्यांनी खते बियाणे कीटकनाशके जादा दराने अथवा चढ्या दराने विक्री करू नयेत. ज्यादा दराने विक्री केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, कोणाचीही गय केली जाणार नाही.
-कल्याण अंबुरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, कृषी कार्यालय, बीड

Web Title: Co-accused Parbhani seller who gave seeds to agricultural center operator of Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.