कोचिंग क्लासेस वॉर शिगेला,विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरुन क्लासचालकास लावले पिस्तूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 01:43 PM2022-02-04T13:43:18+5:302022-02-04T13:54:17+5:30
गावठी कट्टा लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, शिवाय कुटुंबीयांना संपविण्याची धमकी दिली.
बीड : कोरोना संसर्गामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे कल वाढला असून क्लासेस चालकांतील व्यावसायिक स्पर्धा टोकाला पोहोचली आहे. यातून एका क्लासचालकास लातूरच्या दोन क्लासेस चालकांनी पिस्तूल लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी शहरातील शाहूनगरात घडला.
हर्षल भास्करराव केकाण (३५, रा. डीपी रोड, बीड) हे खासगी कोचिंग क्लासेस घेतात. शहरातील शाहूनगरातील आदित्य टॉवर येथे त्यांची संस्था आहे. त्यासमोरच लातूर येथील पंकज तांबारे व श्रीनिवास तांबारे यांचा शिकवणी वर्ग आहे. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हर्षल केकाण हे आपल्या क्लासेसमधील दालनात होते. यावेळी पंकज तांबारे व श्रीनिवास तांबारे यांनी त्यांना दुसऱ्या खोलीत कोंडून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, केकाण यांनी तो चुकविला. त्यानंतर गावठी कट्टा लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, शिवाय कुटुंबीयांना संपविण्याची धमकी दिली. याप्रकरणी हर्षल केकाण यांच्या तक्रारीवरुन पंकज व श्रीनिवास तांबारे यांच्यावर शिवाजीनगर ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर तपास करत आहेत.
व्यावसायिक स्पर्धेतून वाद शिगेला
दरम्यान, फिजिक्स विषयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरुन दोन्ही क्लासेसमध्ये चढाओढ आहे. यातून त्यांच्यात छुपा संघर्ष आहे. यातूनच गावठी पिस्तूल लावण्यापर्यंतचे पाऊल उचलले गेले. या वादाला व्यावसायिक स्पर्धेची किनार असल्याचा संशय आहे.