राज्यात महाआघाडी साथ-साथ, जिल्ह्याच्या राजकारणात समन्वयाची गाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:36 AM2021-08-19T04:36:54+5:302021-08-19T04:36:54+5:30
बीड : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जिल्ह्यात राजकीय विरोध असला तरी ‘मिल बांट के’ संस्कृती रुजल्याचे दिसत आहे. ...
बीड : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जिल्ह्यात राजकीय विरोध असला तरी ‘मिल बांट के’ संस्कृती रुजल्याचे दिसत आहे. समन्वयातून सोयीची गाठ बांधली गेल्याने राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना व कॉंग्रेस कोणाचीच पाठीला पाठ नसल्याचे चित्र जिल्ह्याच्या राजकारणावर कटाक्ष टाकला असता दिसून आले. राज्यात सत्तापरिवर्तनानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. नेत्यांची विधाने, विचारधारा, राजकीय टिपणी, टीका माध्यमांतून उमटल्यानंतर विरोधाभास एक-दोन दिवसांपुरताच दिसून आला, तर जिल्ह्यातही तिन्ही पक्षांचे नेते सामंजस्याने सोयीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव सर्वाधिक दिसत असलातरी कोणाचे काम अडले किंवा झाले नाही, अशा तक्रारी सामाजिक पटलावर उमटलेल्या नाहीत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद व नगर पंचायत असो शासकीय योजनेतील कामे किंवा स्थानिक प्रश्नांवर तिन्ही पक्षातील नेतेमंडळी क्षणिक बोलतात, मात्र त्यात तीव्रता दिसलेली नाही. विरोधी पक्ष म्हणून भाजपकडून प्रासंगिक आंदोलने होत असलीतरी विरोधाची धार बोथटच जाणवते. त्यामुळे पक्षापेक्षा स्थानिक राजकारणाला महत्त्व देत सगळे पक्ष आपल्या परीने वाटचाल करीत आहेत.
पंचायत समिती
जिल्ह्यात ११ पैकी ६ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे, तर चार ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. धारूरमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव असला तरी कॉंग्रेसला आपल्या कामांसाठी झगडावे लागते. इतर ठिकाणी मात्र राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी, राजकीय सोयीने कामकाज करताना दिसतात. जेथे ज्याचे संख्याबळ तेथे त्या पक्षाचा प्रभाव आहे.
जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेतही सत्तांतरासाठी राष्ट्रवादीला महाविकास आघाडीमुळे तिन्ही पक्षांनी राजकीय सोयीने पदांची वाटणी करून घेतली. मात्र कॉंग्रेसच्या तीन सदस्यांपैकी दोघांनी भाजप, तर एकाने राष्ट्रवादीशी जवळीकता ठेवल्याने कॉंग्रेस नावालाच दिसते.
बीड नगरपालिका
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या बीड नगरपालिकेत क्षीरसागरांचीच सत्ता राहिली आहे. निवडून आलेल्या पक्षाचे चिन्ह हा मुद्दा केवळ तांत्रिक आहे. राज्यातील सत्तेच्या प्रवाहात राहण्यासाठी पक्ष प्रवेश तसेच नेत्यांचे पक्षबदल झाले. पालिकेत मात्र पक्षीय प्रभाव दिसून आलेला नाही. सत्ताधाऱ्यांकडून बेरजेचे राजकारण करीत संख्याबळ वाढविण्याची खेळी आणि शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या कामांमुळे येथे सर्वच विरोध गळून बसले आहेत. स्थानिक राजकीय तडजोडींमुळे पालिकेत पक्ष हा मुद्दा गौण ठरला आहे.
तीन पक्ष; पण धोरण महाआघाडीचे
राज्यातील महाविकास आघाडीमुळे स्थानिक पातळीवरही बीड जिल्ह्यात तीन पक्ष तीन विचारांचे असलेतरी कोणीच कोणाला अडवायचे नाही, समन्वयातून विकासकामे करायची, शासन योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसत नसले तरी महाआघाडीची जी लाइन त्याच धर्तीवर जिल्ह्यातील राजकारण असा विचारप्रवाह रुजला आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर तीन पक्षांचे तीन विचार असे अद्याप पहायला मिळालेले नाही.
प्रतिसाद, सन्मान, समन्वय
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधारी दुसऱ्या पक्षाचे असलेतरी वेळोवेळी कामे, मागणीबाबत कॉंग्रेसला प्रतिसाद मिळालेला आहे. सन्मान मिळतो. अडचणी येत नाहीत.
- राजकिशोर मोदी, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस
------
जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्ष आमच्या सोबत आहे. जिल्ह्यातील ज्या पंचायत समित्या आमच्या ताब्यात आहेत तेथे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समन्वयाने काम करत आहेत. ज्या नगरपंचायत आमच्या ताब्यात आहेत त्या ठिकाणी आम्ही समन्वयाने काम करत आहोत.
- बजरंग सोनवणे
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बीड
----------