खेळी की योगायोग; उमेदवारांची सारखी नावे दोन आमदारांचा करणार 'कार्यक्रम'?
By सोमनाथ खताळ | Published: November 8, 2024 04:51 PM2024-11-08T16:51:54+5:302024-11-08T16:52:51+5:30
नाव आणि आडनाव सारखेच : लोकसभेत चिन्हावरून आता नावावरून उडेल गोंधळ
- सोमनाथ खताळ
बीड : लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी या दोन चिन्हांवरून गोंधळ उडाला होता. याचा काही ठिकाणी फटका बसल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. आता विधानसभेतही चिन्हाऐवजी सारख्या नावांमुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. याचा फटका दोन विद्यमान आमदारांना बसू शकतो. हा योगायोग आहे की विरोधकांची खेळी? हा मात्र प्रश्न आहे. सध्या तरी या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यातील बीड, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि गेवराई या सहा विधानसभा मतदारसंघांत ४०७ उमेदवारांनी ५६६ अर्ज दाखल केले होते. यातील ३० अर्ज अवैध ठरले. २३८ जणांनी माघार घेतली असून, आता १३९ जण निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील ८१ उमेदवार अपक्ष रिंगणात आहेत. केज आणि परळीत दुरंगी लढत हाेत आहे. गेवराईत तिरंगी, तर आष्टीत चौरंगी आणि बीड व माजलगावमध्ये पंचरंगी लढत होत आहे. परंतु, गेवराई, माजलगाव आणि परळी मतदारसंघात नाव आणि आडनाव सारखे असलेले सहा उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. त्यामुळे लोकसभेत चिन्हावरून गोंधळ उडाल्याचा दावा जसा महाविकास आघाडीने केला होता, तसाच आता प्रमुख उमेदवारांकडूनही केला जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी या नावांची चर्चा जोरात आहे. विरोधकांकडून या नावांचा वापर करून राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्नही होऊ शकतो, असे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
...यांना बसेल फटका
गेवराईत भाजपचे लक्ष्मण माधवराव पवार हे विद्यमान आमदार आहेत. ते सध्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासारखेच लक्ष्मण अंबादास पवार या नावाचे उमेदवार गेवराईत आहेत. तसेच माजलगावातही अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सुंदरराव सोळंके यांच्याप्रमाणेच प्रकाशदादा भगवान सोळंके नावाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पहिल्या आणि शेवटच्या सारख्या नावाचा फटका या दोन्ही विद्यमान आमदारांना बसू शकतो.
परळीतही दोन देशमुख
परळी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राजेसाहेब श्रीकिशन देशमुख हे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह घेऊन मैदानात आहेत. त्यांच्याप्रमाणे राजेसाहेब सुभाष देशमुख हेदेखील बासरी चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत. या चिन्हावरूनही गोंधळ होऊ शकतो. येथे महायुतीकडून अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे रिंगणात आहेत.