जिल्हाधिकारी, सीईओ, एस.पी. कुटुंबासह पोहोचले मांडवजाळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:20 AM2019-11-18T00:20:29+5:302019-11-18T00:21:06+5:30
संवाद ग्रामस्थांशी अभियानांतर्गत १७ नोव्हेंबर रोजी रविवारी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहपरिवार बीडजवळच्या मांडवजाळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन गाव परिसरातील विषयांवर चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : संवाद ग्रामस्थांशी अभियानांतर्गत १७ नोव्हेंबर रोजी रविवारी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहपरिवार बीडजवळच्या मांडवजाळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन गाव परिसरातील विषयांवर चर्चा केली. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांची ही संकल्पना होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनीही सहभागी होत हा उपक्रम प्रत्यक्षात उतरविला. हे तिन्ही वरिष्ठ अधिकारी म्हणजे अख्खे जिल्हा प्रशासनच सुटीच्या दिवशी मांडवजाळी येथे आल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला.
या तिन्ही अधिकाऱ्यांनी मांडवजाळी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांनी जिल्हा परिषद शाळेसह प्रत्यक्ष गावामध्ये फिरून विविध भागाची पाहणी केली. वयोवृद्ध महिला कोंडाबाई बहीरवाळ, चंद्रभागा भंडाणे, तुळसाबाई जाधव, नंदा बहिरवाळ यांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच मांडवजाळीच्या अन्य ग्रामस्थांशी चर्चा करून गावातील विविध प्रश्न जाणून घेतले.
ते सोडवण्यासाठी संबंधित अधिकाºयांना सूचना केल्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याची टाकी व जल शुद्धीकरण यंत्रणेचे (फिल्टर) फित कापून उद्घाटन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे पिता हृदयराम पाण्डेय, माता कल्पना पाण्डेय, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या माता ज्योत्स्ना पोद्दार, मांडवजाळीचे सरपंच दादासाहेब बहिरवाळ, उपसरपंच अर्जुन चंदेल, पोलीस पाटील काशीनाथ पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास मंडळ अधिकारी अरविंद गायकवाड, तलाठी मीनल खांडे, ग्रामसेवक गणेश जाधव, माजी उपसरपंच हनुमान बहिरवाळ, बापू बहिरवाळ, विठ्ठलराव सुभाष बहिरवाळ, संजय बहिरवाळ, नामदेव वायकर, अर्जुन येवले, नाना बहिरवाळ, गणेश वीर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देणार
पुन्हा भेट
मांडवजाळी येथील समस्या जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी जाणून घेतल्या. दरम्यान त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिका-यांना सूचना देखील दिल्या आहेत. तसेच दिलेल्या सुचनेप्रमाने गावातील कामे झाले आहेत का याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी हे पुन्हा गावाला भेट देणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी यांनी गावात भेट दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.