अंधत्वावर मात करून झाला कलेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:33 AM2021-04-08T04:33:27+5:302021-04-08T04:33:27+5:30
बीड : जग पाहणाऱ्या डोळ्यांना आनुवंशिक आजारामुळे कायमचे अंधत्व आले. असे असले तरी त्यावर खचून न जाता स्वतःला सिध्द ...
बीड : जग पाहणाऱ्या डोळ्यांना आनुवंशिक आजारामुळे कायमचे अंधत्व आले. असे असले तरी त्यावर खचून न जाता स्वतःला सिध्द करून बीडचा युवक जयंत किशोर मंकाळे कलेक्टर झाला आहे. ही बाब बीडसाठी नक्कीच गौरवाची आहे. त्यामुळे युवकांनी मंकाळे यांच्या जिद्दीची प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.
बीड येथील रिपाइंच्या मध्यवर्ती कार्यालयात जयंत मंकाळे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पप्पू कागदे बोलत होते. यावेळी राजू जोगदंड, अविनाश जोगदंड, संतोष जाधव आदींची उपस्थिती होती. सत्कारावेळी पप्पू कागदे म्हणाले की, जयंत मंकाळे यांचे यश युवकांसाठी प्रेरणादायी आहे. बीड येथे शिक्षण घेत असताना आनुवंशिकतेमुळे डोळ्यांची दृष्टी गेली. परंतु, कलेक्टर होण्याची जिद्द आणि अभ्यासाचे कठोर श्रम आज कलेक्टर पदापर्यंत जाऊन पोहोचले आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १४३ रँक मिळवून बीडचा अंध युवक कलेक्टर झाला, ही गोष्ट कौतुकाची असून युवकांमध्ये ऊर्जा निर्माण करणारी आहे, असे पप्पू कागदे म्हणाले. यावेळी मार्गदर्शन करताना मंकाळे यांनी कठोर परिश्रम करताना आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे सांगितले. यावेळी रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
070421\072_bed_14_07042021_14.jpeg
===Caption===
बीड येथील रिपाइंच्या मध्यवर्ती कार्यालयात जयंत मंकाळे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार करताना पप्पु कागदे .