जिल्हाधिकारी शर्मा शेतकऱ्यांच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:31 AM2021-09-13T04:31:55+5:302021-09-13T04:31:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची शनिवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची शनिवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर त्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.
बंगालीपिंपळा, शेकटा येथे पाझर तलाव फुटल्याने झालेले नुकसानीसह इतर काही गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसानीचे पंचनामे करुन पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश तालुका प्रशासनाला दिले. भेंड बु., मारफळा, भेंड खु., तलवाडा, खोपटी तांडा येथे सात पाझर तलाव फुटल्याने भरलेल्या तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेले. परिणामी तलावाच्या खालील शिवारातील जमिनीची व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील मातीसह पिके पूर्णतः वाहून गेले. शेतात मोठ-मोठे घळ पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. नागझरी, सावळेश्वर, आम्ला धानोरा या गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, तर नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश गेवराई तालुका प्रशासनाला यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतेवेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, आमदार लक्ष्मण पवार, तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
120921\12bed_2_12092021_14.jpg
जिल्हाधिकारी शर्मा शेतकऱ्यांच्या बांधावर