जिल्हाधिकारी, सीईओंचे नियोजनासाठी सिव्हिलमध्ये ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:35 AM2021-05-27T04:35:07+5:302021-05-27T04:35:07+5:30
बीड : मागील काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील नियोजन पूर्णपणे ढेपाळले आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी वारंवार ...
बीड : मागील काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील नियोजन पूर्णपणे ढेपाळले आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी वारंवार भेटी देऊन नियोजन करत आहेत. बुधवारीही हे दोन्ही अधिकारी दुपारी दोन तास ठाण मांडून होते. नातेवाइकांना बाहेर काढून त्यांची ॲंटिजन चाचणी केली तसेच ड्यूटीचा आढावाही घेतला.
जिल्हा रुग्णालयातील वाढत्या तक्रारी आणि वारंवार सूचना देऊनही सुधारणा होत नसल्याने खुद्द जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्यांनी आपली यंत्रणा रुग्णालयात कार्यान्वित केली आहे. असे असले तरी उपचार व सुविधांबाबत तक्रारी कमी होत नसल्याचे दिसत आहे. हाच धागा पकडून जगताप व कुंभार हे दोन्ही अधिकारी नियमित येथे येऊन राऊंड घेतात. बुधवारीही या दोघांनी कोरोना वॉर्डचा राऊंड घेतला. वॉर्डमध्ये अनावश्यक थांबलेल्या सर्व नातेवाइकांना बाहेर काढत त्यांची ॲंटिजन चाचणी केली तसेच बाहेर आल्यानंतर डॉक्टर, कर्मचाऱ्यांची ड्यूटी लिस्ट चेक करत त्यात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, डॉ. सचिन आंधळकर, डॉ.महेश माने आदींची उपस्थिती होती.
ये चल इकडे ये, मला सांग...
एक नातेवाईक एका रुग्णाला ॲडमिट करण्यासाठी आला होता. त्याच्या हातात सर्व पेपर होते. त्यांनी डॉ. गित्ते यांना ते दाखविले. परंतु, जिल्हाधिकारी जगताप यांनी ‘ये चल इकडे ये, मला सांग..’, असे म्हणत ते पेपर हाती घेतले. एवढेच नव्हे तर त्या रुग्णाची अडचण दूर करेपर्यंत त्यांनी पाठपुरावा केला.
६७ पैकी १ नातेवाईक बाधित
जिल्हाधिकारी व सीईओ यांनी कोरोना वॉर्डमधील सर्व नातेवाईक बाहेर काढले. यात ६७ लोकांची तपासणी केली असता केवळ एक बाधित आढळला. असे असले तरी नातेवाइकांनी मध्ये थांबावे, असे मुळीच नाही. पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असला तरी सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.
कलेक्टर, सीईओंना का यावे लागते?
मागील महिनाभरापासून जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी जगताप व सीईओ कुंभार हे वारंवार राऊंड घेतात. कुंभार यांनी तर पूर्ण नियोजन करण्यासाठी दिवसरात्र जागरण केले. खाटा, ऑक्सिजनसाठी त्यांनी योग्य नियोजन केले. त्यांनी एका तहसीलदारांसह अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर येथील नियोजनाची जबाबदारी साेपविली. ही वेळ केवळ येथील अधिकाऱ्यांना नियोजन न करता आल्याने आली आहे. आरोग्य विभागाचे नियोजन महसूल व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना करावे लागणे ही येथील अधिकाऱ्यांचे अपयश असल्याचे बोलले जात आहे.
नर्सिंगच्या मुली घेणार काळजी
आता गंभीर रुग्णांची काळजी घेण्यासाठी नर्सिंगच्या विद्यार्थिनी नियुक्त केल्या आहेत. त्या पूर्ण काळजी घेतील, असा विश्वास कुंभार यांनी व्यक्त केला. त्यामुळे नातेवाइकांनी संसर्ग टाळण्यासाठी कोरोना वॉर्डमध्ये जाऊ नये, असे आवाहनही जगताप व कुंभार यांनी केले आहे.
===Photopath===
260521\26_2_bed_12_26052021_14.jpeg~260521\26_2_bed_11_26052021_14.jpeg
===Caption===
रूग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणी जाणून घेताना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप.~डॉक्टरांची ड्यूटी लिस्ट व इतर माहिती घेताना सीईओ अजित कुंभार. सोबत नोडल ऑफिसर डॉ.महेश माने व त्यांची टीम.